नवरगावात बैल पोळ्यासोबतच ट्रॅक्टर पोळा

0
1115

तालुका प्रतिनिधी : पारंपारीक बैलपोळा बैलाच्या कमतरतेने लोप पावण्याला जेमतेम सुरुवात झाली असून या यांत्रीक युगामुळे शेतीची मशागतीची कामे आता ट्रॅक्टर या यंत्राने व्हायला लागली आहे. आता ट्रॅक्टर हेच शेतकऱ्यांचे दैवत झाले असून, यावर्षी पांरपारीक बैल पोळ्याला बगल देत ट्रॅक्टर मालकांनी आणि त्या चालकांनी ट्रॅक्टर पोळा नवरगावातील बाजार चौकात भरविण्यात आल्याने हा पोळा आणि गावातून निघालेली ट्रॅक्टरची मिरवणुक आकर्षणाचे केंद्रबिंदु आणि औसुक्याचा विषय ठरला.शेतकऱ्यांचे शेती मशागतीचे साधन म्हणून अनादिकाळापासून बैलांना अनन्य साधारण महत्व आहे. शेतीत वर्षभर राबणाऱ्या सर्जा-राजाची पोळा या सणाला शेतकरी मनोभावे पुजा करून त्याला गोडधोड खाऊ घालतो. ही परंपरा कित्येक वर्षापासून चालत आली आहें. परंतु या परंपरेवर विरजन पडत आहे ते विज्ञान युगातील यांत्रिकीकरणामुळे..!
या विज्ञान युगात बैलाची जागा आता ट्रॅक्टरने घेतली. शिवाय कमी वेळात झटपट काम ट्रॅक्टरसारख्या यंत्राने व्हायला लागल्याने अर्थातच बैलाची गरज संपायला लागली, त्यामुळे शेतकरी आणि पशुपालक बैलांकडे कानाडोळा करायला लागल्याने पोळयाच्या पुजेसाठी बैलजोड़ी मिळणे दुरापास्त होत चालले आहे.शेतकऱ्याच्या शेती मशागतीची जागा बैलांऐवजी ट्रॅक्टरने घेतल्याने यावर्षी नवरगावात ट्रॅक्टरचा पोळा बाजार चौकात भरविण्यात आला. या आकर्षणाच्या ठरलेल्या पोळ्यात ५०- ६० ट्रॅक्टर सहभागी झाले होते. सदर ट्रॅक्टरची गावातील मुख्य रस्त्याने मिरवणुक काढण्यात आल्याने हा नवोदित ट्रॅक्टर पोळा औसुक्याचा विषय ठरला.