चिरंतन फाऊंडेशनचा गणेशोत्सव;शाडूच्या मातीच्या मुर्तींचे वितरण – इको फ्रेंण्डली गणेश विसर्जनाची व्यवस्था

0
560

संस्थाध्यक्षा मिरा कोरपे यांचा उपक्रम झाला १८ वर्षांचा 

जलप्रदूषण नियंत्रण व पर्यावरण संरक्षण

अकोट – गत १८ वर्षांपूर्वी जलप्रदूषण नियंत्रण व पर्यावरण संरक्षणाच्या उदात्त हेतूने स्थापन झालेल्या चिरंतन फाऊंडेशनने या वर्षी सुध्दा घरोघरी शाडू मातीच्या इको फ्रेंण्डली श्रीगणेश मुर्ती स्थापन करण्याचे आवाहन गणेशभक्तांना केले आहे.त्यासाठी फाऊंडेशनने पोपटखेड मार्गावरील हॉटेल अक्षयपात्रजवळील कोरपे निवास येथे श्रींच्या मुर्तींच्या वितरणाची व्यवस्था केली असल्याची माहिती संस्थाध्यक्षा मिरा अनिल कोरपे यांनी दिली.

चिरंतन फाऊंडेशनचा इको फ्रेण्डली गणेशोत्सव अकोट तालुक्यात लोकप्रिय आहे.दरवर्षी गणेशभक्त या फाऊंडेशनच्या शाडूच्या मुर्ती घरी नेऊन दहा दिवस श्रीगणेशाची मनोभावे भक्ती-आराधना करतात.श्रींच्या मुर्ती स्थानिक मुर्तीकारांकडून खास तयार करुन घेतल्या जातात.ह्या मुर्ती सुबक,सुंदर,आकर्षक असतात.त्यांच्यात श्रीगणेशाची विविध रुपं पाहायला मिळतात.

दहा दिवसानंतर चिरंतन फाऊंडेशन तर्फे पोपटखेड मार्गावरील रोटरी नेत्र रुग्णालयाच्या परिसरात इको फ्रेंण्डली गणेश विसर्जनचीही व्यवस्था केली जाते.जे गणेश भक्त त्या ठिकाणी श्रींच्या मुर्ती विसर्जित करतात;त्या प्रत्येक  भक्ताला या फाऊंडेशनच्या वतीने संस्थाध्यक्षा मिरा कोरपे स्वतः एक वृक्षरोपटे भेटस्वरुप देतात.याही वर्षी गणेशभक्तांनी इको फ्रेंण्डली पध्दतीनेच गणेशविसर्जन करावे व पर्यावरण रक्षणास हातभार लावावा,असे आवाहन  त्यांनी केले आहे.

चिरंतन फाऊंडेशन ही नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था असून फाऊंडेशनच्या या उपक्रमासाठी मिरा कोरपेंना त्यांचे पति अनिल कोरपे,मुले ञुषिकेश व शिवराज कोरपे यांचे अहर्निश सहकार्य लाभते.वसुंधरेच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्र यावे,असे आवाहन कोरपे परिवाराने केले आहे.