ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते पद्मावती गल्ली, होळकर चौकात अंतर्गत रस्त्याचे थाटात लोकार्पण

0
794
Google search engine
Google search engine

रस्ते दर्जेदार करायचे होते, म्हणूनच राष्ट्रवादीच्या हातात निधी पडू दिला नाही

प्रतिनिधी:- दिपक गित्ते

परळी दि. ११ – राष्ट्रवादी काँग्रेसने शहराची पुरती वाट लावली, एकही काम नीट केले नाही. शहरातील अंतर्गत रस्ते तरी किमान चांगले व्हावेत आणि नागरिकांचा त्रास कमी व्हावा यासाठी मी विशेष रस्ता अनुदानातून निधी आणला आणि या निधीतून रस्ते दर्जेदार केले. रस्त्याचे काम चांगले करायचे होते म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात निधी पडू दिला नाही, नसता हा निधीही ‘खाण्यातच’ गेला असता अशा शब्दांत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी राष्ट्रवादीवर सडकून टीका केली.

पदमावती गल्ली व होळकर चौकात विशेष रस्ता अनुदानातून पुर्ण झालेल्या अंतर्गत सिमेंट रस्ता कामांचे लोकार्पण पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते मंगळवारी मोठ्या थाटात झाले, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. भाजपचे प्रदेश चिटणीस राजेश देशमुख, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, ज्येष्ठ नेते दत्ताप्पा इटके, शेख अब्दुल करीम, पांडूरंग सोनी, दत्ता देशमुख, दिलीप बिडगर, नगरसेवक पवन मुंडे, उमेश खाडे आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना ना पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, परळी मतदारसंघाच्या विकासासाठी सत्तेच्या माध्यमातून मी भरभरून निधी दिला. ग्रामीण भागाला खूप दिले. परळी शहरही मला स्मार्ट करायचे होते, परंतु नगरपरिषदेत सत्ता नसल्याने खूप इच्छा ते शक्य झाले नाही, जो निधी मंजूर केला त्यातही त्यांनी आडकाठी आणली, परंतु मी एवढ्यावर थांबले नाही, वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासाचा १३३ कोटीचा आराखडा मंजूर केला, त्यासाठी निधीही उपलब्ध केला. अंतर्गत रस्ते चांगले करण्यासाठी पहिल्यादा पांच कोटी व आता वीस कोटी रु. मंजूर केले असून त्याचे कामही लवकरच सुरू होईल.

राष्ट्रवादीचा घेतला समाचार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शहराची वाट लावली, खराब रस्ता, कचरा, घाणीचे साम्राज्य आदीला जनता वैतागली आहे, पाणी वाटपातही भेदभाव केला, बोगस बीलं आणि गुत्तेदार पोसण्यासाठी पालिकेचा वापर केला गेला, जनतेच्या समस्या तशाच राहिल्या, त्यामुळे रस्त्याचा निधी त्यांच्या हातात पडू दिला नाही, नसता तो ही खाण्यातच गेला असता. भ्रष्टाचाराला थारा देणारी राष्ट्रवादी काही दिवसांनी पुर्ण संपलेली दिसेल, तिला कुठलेही भविष्य नाही त्यामुळे अशा लोकांच्या मागे जाऊन स्वतःचे नुकसान करून घेवू नका अशा शब्दांत त्यांनी राष्ट्रवादीचा समाचार घेतला.

तुमच्या सेवेसाठी राजकारणात

मी कुणाचा पराभव करण्यासाठी नाही तर तुमच्या सेवेसाठी व सुरक्षेसाठी राजकारणात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची साथ मला आहे मग तुमची का नको? चांगले विचार घेऊन मी काम करतेय. एखादे काम भलेही कमी झाले असेल परंतु नागरिकांना कधी त्रास दिला नाही, चांगले काम करणारे नेतृत्व जपले तर चांगलेच होते त्यामुळे मला आशीर्वाद द्या असे आवाहन त्यांनी केले आहे.

प्रारंभी ना पंकजाताई मुंडे यांचे रहिवाशांनी जोरदार स्वागत केले. यावेळी राहूल टाक, राम तोष्णीवाल, प्रदीप मुंडे, केदार देशमुख, मुंजा फुके, बाळू फुले यांच्यासह स्थानिक नागरिक, महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.