चांदूर मध्ये प्लास्टीक विरोधी मोहीम – ५ व्यावसायीकांकडून ७२ किलो प्लास्टीक जप्त करून दंडात्मक वसूली

0
1334
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे – (शहजाद खान)

राज्यात प्लास्टिक बंदीच्या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी होत असतांना अजुनही प्लास्टीकचा वापर सर्रास वापर सुरू आहे. अशातच चांदूर रेल्वे शहरात नगर परिषदतर्फे प्लास्टीक विरोधी मोहीम राबविण्यात आली असुन ५ दुकानदारांकडून ७२ किलो प्लास्टीक जप्त करून कारवाई करण्यात आली.

शासनाच्या वतीने प्लास्टिक पासून बनवल्या जाणाऱ्या पिशव्या (कॅरीबॅग, हॅंडल असलेल्या व नसलेल्या थैल्या) थर्माकाेल व प्लास्टिक पासून बनवण्यात आलेले व एकदाच वापरल्या जाणाऱ्या वस्तू जसे ताट, कप, ग्लास, चमचे, वाटी, भांडे तसेच हॉटेल्समध्ये पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे भांडे व वाटी, स्ट्रॉ, नाॅन वोवेन पॉलीप्रोपिलीन बॅग्ज, सजावटीसाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक, थर्माकोल, द्रवपदार्थ साठवण्यासाठी वापरात येणारे प्लास्टिक पाऊच, कप, सर्व प्रकारचे अन्नपदार्थ आदी साठवण्यासाठी वापरले जाणारे प्लास्टिक यावर संपूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. मात्र शहरात प्लास्टीकचा सर्रास वापर होत असल्याची बाब नगर परीषदेला माहित होताच बुधवारी प्लास्टीक विरोधी मोहीम चालविण्यात आली. यामध्ये २५ दुकानांची तपासणी करण्यात येऊन ५ व्यावसायिकांकडून ७२ किलो प्लास्टीक जप्त करून दंडात्मक कारवाई करण्यात आली. या मोहिमेमुळे व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

या मोहीमेत नगर परीषदेचे कार्यालयीन अधीक्षक धनराज गजभीये, प्रवीण ठोंबरे, आशिष कुकडकार, आरोग्य निरीक्षक नितीन इमले, कर्मचारी जितेंद्र कर्से, सुभाष डोंगरे, बंडु वानखडे, चंद्रकांत गिरी, प्रकाश गिरी, भाग्यश्री चांडोरे, जयश्री अर्के, उज्वला पटले, स्वाती गणोरकार, संगिता इमले, मनिष कनोजे यांचा सहभाग होता.