गुन्हेगारी पार्श्वभूमीची प्रसिद्धी करणे उमेदवारांना बंधनकारक

0
1121

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019

गुन्हेगारी पार्श्वभूमीची प्रसिद्धी करणे उमेदवारांना बंधनकारक

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार निवडणूक उमेदवारीचा फॉर्म भरणाऱ्या व फौजदारी प्रकरणे दाखल असलेल्या सर्व उमेदवारांनी त्यांच्यावर असलेल्या फौजदारी प्रकरणांची माहिती घोषणापत्राद्वारे वृत्तपत्रे व टीव्ही वाहिन्यांवर प्रसिद्ध करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
उमेदवारांनी आपल्यावर दाखल गुन्ह्यांची माहिती दैनिकांत तसेच वृत्त वाहिन्यांवर जाहिरातीच्या स्वरुपात कमीत कमी तीन वेळा प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. प्रलंबित प्रकरणे किंवा पूर्वी दोषसिद्ध झालेली प्रकरणे हा सर्व तपशील मतदारांच्या माहितीसाठी माध्यमांतून प्रसिद्ध करावा लागणार आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापासून ते मतदानाच्या तारखेपूर्वी दोन दिवस आधी या कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने घोषणापत्राचा नमुना प्रपत्र सी-1 मध्ये उपलब्ध करून दिला आहे. या प्रसिद्धीनंतर त्याचा अहवाल सर्व उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे प्रपत्र सी – 4 मध्ये भरून द्यावयाचा आहे.
25 सप्टेंबर 2018 च्या न्यायालयीन निर्णयानुसार निवडणुकीला उभे असणाऱ्या उमेदवारांनी त्यांच्या फौजदारी चारित्र्याबद्दल जनतेला अवगत करणे आवश्यक आहे. त्यामुळे जाहिरातीतील मजकूर सुस्पष्ट असावा. प्रत्येक प्रकरणासाठी स्वतंत्र ओळींमध्ये तपशील द्यावा. मजकुराचा फाँट आकार किमान 12 असावा, अशी सूचना आयोगाने केली आहे.
निवडणूक संपल्यानंतर 30 दिवसांच्या आत या जाहीरातींची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांना द्यावी लागणार आहे. त्यासोबत जाहीरात छापून आलेल्या वृत्तपत्रांच्या प्रती सादर कराव्या लागणार आहेत. ही जाहीरात 3 वेळा प्रसिद्ध करणे बंधनकारक असून, ती न केल्यास कारवाईची तरतूदही आयोगाने केली आहे.