ऐतिहासिक नेहरु मैदानात मनपा इमारत हलवण्यास भाजपाचा तीव्र विरोध ; मैदाने वाचली पाहिजे भाजपाची स्पष्ट भूमिका

अमरावती :-

विकासाच्या गोंडस नावाखाली अमरावती शहरातील मैदाने गिळंकृत करण्याच्या कृतीला भारतीय जनता पार्टीचा तीव्र विरोध असून नेहरु मैदानाचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेता ते आणि शहरातील इतर मैदाने देखील कायम ठेवण्यात यावी, अशी स्पष्ट भूमिका भाजपा नेते खा. डॉ. अनिल बोंडे यांनी आज पत्रपरिषदेत मांडली.
अमरावती महानगरपालिका इमारत नेहरू मैदानात बांधून महानगरपालिकेच्या मूळ जागेवर व्यापारी संकुल बांधण्यात येणार असल्याच्या निर्णयाचे वृत्त काल प्रकाशित झाले होते. या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी भाजपाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत खा. डॉ अनिल बोंडे बोलत होते. यावेळी भाजपा नेते प्रवीण पोटे पाटील, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, माजी महापौर किरणताई महल्ले प्रामुख्याने उपस्थित होते.
नेहरू मैदानाला ऐतिहासिक महत्व आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात याच मैदानात अमरावतीकरांनी स्वराज्याची शपथ घेतली होती. या मैदानाचे सौंदर्यीकरण व्हावे. इथे असलेली शाळेची इमारत ‘हेरिटेज’ आहे. त्या इमारतीला सजवून त्यावर विविध प्रकारचे लाईट्स सोडून त्या इमारतीत अमरावतीचा इतिहास दर्शवणारे संग्रहालय व्हावे. अमरावती शहराच्या मध्यभागी छोटे का असेना एकमेव मैदान शिल्लक आहे. त्या मैदानाशी अमरावतीकरांचे भावनिक नाते जुळले आहे. अतिशय दाट वस्तीच्या मुंबईसारख्या शहरात देखील मैदानांचे संवर्धन आणि जतन करण्यात येते. अमरावतीत देखील याचप्रकारचा विचार करण्यात यावा. नेहरु मैदान, दसरा मैदान, सायन्सकोर मैदान अशा सर्व मैदानांना ऐतिहासिक महत्व असून त्यांचे जतन करण्यात यावे, अशी आग्रही मागणी भाजपाच्या वतीने करण्यात आली.
राजकमल चौकातील गजबजलेल्या जागेतून इमारत हटवून ती पुन्हा गजबजलेल्या भागातच नेण्याची कल्पना हास्यास्पद आहे. विद्यापीठ मार्गावर जागा उपलब्ध असताना नेहरू मैदानाचा बळी घेणे योग्य नसल्याचे स्पष्ट प्रतिपादन डॉ. अनिल बोंडे यांनी केले. या निर्णयाला आमचा प्रखर विरोध असून काम पडल्यास आम्ही जनआंदोलन उभारू. यासाठी आम्ही ‘नेहरु मैदान बचाव कृती समिती’ गठीत केली असून आम्ही अखेरपर्यंत लढा देऊ असेही पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले. नेहरू मैदान संरक्षण व संवर्धनासाठी भाजपाच्या वतीने विशेष कार्यक्रम हाती घेतला जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले.