जाहिरातीचा मजकूर पूर्वप्रमाणित करून घेणे उमेदवारांना बंधनकारक · पेड न्यूजबाबत नियमित तपासणी करण्याचे आयोगाचे आदेश

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019

जाहिरातीचा मजकूर पूर्वप्रमाणित करून घेणे उमेदवारांना बंधनकारक

· पेड न्यूजबाबत नियमित तपासणी करण्याचे आयोगाचे आदेश

अमरावती, दि. 4 : मुद्रित माध्यमे, दूरवाहिन्या, सोशल मीडिया, फ्लेक्स, पत्रके आदी विविध माध्यमांतील जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीकडून करून घेणे उमेदवारांना बंधनकारक करण्यात आले आहे. पेड न्यूजबाबत नियमित तपासणी करून वेळोवेळी माहिती सादर करण्याचे आदेशही निवडणूक आयोगाने दिले आहेत.

उमेदवारांनी आपल्या जाहिरातीचे प्रसारण होण्याआधी पूर्वप्रमाणीकरणासाठी निवडणूक निर्णय अधिका-यांकडे अर्ज जाहिरातीच्या मसुद्यासह सादर करावा. सदर मसुद्याचे समितीतील सदस्यांकडून परीक्षण होऊन त्याला जिल्हा निवडणूक अधिकारी यांची मान्यता घेऊन जाहिरातीचे प्रमाणपत्र संबधितांना देण्यात येईल. टीव्ही अथवा केबल नेटवर्क किंवा आकाशवाणीवर प्रक्षेपित करावयाच्या जाहिरातींचा त्यातील संवादासह लेखी मजकूर दोन प्रतींत द्यावा. त्याचप्रमाणे, जाहिरात तयार करावयास आलेला खर्च, जाहिरातीचा वेळ, प्रक्षेपणासाठीचा खर्च व इतर तपशीलांसह कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

पेड न्यूजला आळा घालण्यासाठी कार्यवाही

बातम्यांच्या माध्यमातून छुप्या पध्दतीने जाहिरात करण्यात येते का, यावर देखरेख ठेवण्याचे काम नियमितपणे करण्याचे आयोगाचे आदेश आहेत.

पेड न्यूज संदर्भात तक्रार आल्यानंतर त्याची तत्काळ दखल माध्यम संनियंत्रण व प्रमाणीकरण समितीने घ्यावी, त्याचप्रमाणे स्युमोटो कार्यवाहीही व्हावी, असे आयोगाचे निर्देश आहेत.

कुठलेही वृत्त एकांगी, प्रचारात्मक असू नये. एका उमेदवाराला त्यांची स्तुती करणारी तसेच समाजाच्या प्रत्येक शाखेचा पाठिंबा मिळत आहे आणि तो मतदारसंघातील निवडणूक जिंकेल असे नमूद करणारी बातमी किंवा अशा छोट्या घटना ज्यात उमेदवाराला अतिशयोक्तीपूर्ण/वारंवार वृत्तव्याप्ती देण्यात येते आणि/किंवा विरोधकांच्या बातम्यांना अजिबात वृत्तव्याप्ती देण्यात येत नाही, अशा घटना आदी विविध निकष आयोगाने निश्चित करून दिले आहेत. त्यानुसार कार्यवाही करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत.

000

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।