स्वतःचा मतदारसंघ सांभाळत ना. पंकजाताई मुंडे करताहेत इतर उमेदवारांसाठीही जीवाचे रान

0
631
Google search engine
Google search engine

*स्वतःचा मतदारसंघ सांभाळत ना. पंकजाताई मुंडे करताहेत इतर उमेदवारांसाठीही जीवाचे रान*

*बीड, गेवराई सह नायगांव, मुखेडच्या सभांना मिळाला प्रचंड प्रतिसाद*

*सभा झाली की विजय पक्का असे समीकरण झाल्याने राज्यभरातून सभांची होतेय वाढती मागणी*

परळी दि. ११—- आमच्या सरकारने पाच वर्षात भरीव कामगिरी करून राज्याला प्रगतीपथावर आणले आहे, त्यामुळे पुन्हा महायुतीचेच सरकार येणार आहे, त्यामुळे आपणही बुडत्या नावेत न जाता महायुतीच्या उमेदवारांना विजयी करून सरकारमध्ये मराठवाड्याचा टक्का वाढवा असे आवाहन राज्याच्या ग्राम विकास आणि महिला व बालकल्याण मंत्री तथा बीडच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज नांदेड जिल्ह्य़ात बोलताना केले.

सध्या ना. पंकजाताई मुंडे यांनी मराठवाड्याच्या विविध भागात सभांचा जोरदार धडाका सुरू केला आहे, त्यांची सभा म्हणजे विजयावर ‘शिक्कामोर्तब’ असे समीकरण झाल्याने त्यांच्या सभांना महाराष्ट्रात प्रचंड मागणी आहे. ना. पंकजाताई मुंडे याही स्वत:चा मतदार संघ सांभाळुन इतर उमेदवारांच्या विजयासाठी जीवाचे रान करीत आहेत.

 

 

*पंकजाताईची सभा म्हणजे विजय पक्का*
———————————–
पंकजाताई मुंडे या महायुतीच्या स्टार प्रचारक आहेत. मात्र त्या परळी मतदार संघात महायुतीच्या उमेदवारही आहेत. त्यामुळे त्यांची प्रचंड धावपळ सुरू आहे. ना. पंकजाताई मुंडे यांची सभा झाली की, विजय हमखास होतोच असे समिकरण असल्याने सर्वच उमेदवारांना त्यांची सभा हवी आहे. आपल्या तडाखेबंद आणि मुद्देसूद भाषणांनी नागरीकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्याची खासीयत त्यांच्याकडे आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या सभांप्रमाणेच ना. पंकजाताई मुंडे यांच्या सभांना जोरदार प्रतिसाद मिळत आहे. त्या केवळ भाजप उमेदवार असलेल्या ठिकाणीच सभा घेतात असे नाही तर युतीचा धर्म पाळत मित्र पक्षाच्या उमेदवारासाठीही सभा देतात.
गुरूवारी शिवसेना उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांच्यासाठी तर गेवराईत भाजपा उमेदवार लक्ष्मण पवार यांच्यासाठी सभा घेऊन त्यांना मतदानाचे आवाहन केले तर आज शुक्रवारी नांदेड जिल्ह्य़ातील नायगाव मतदार संघात उमरी येथे राजेश पवार तर मुखेड मतदार संघात तुषार राठोड यांच्यासाठी सभा घेऊन त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. चारही ठिकाणी त्यांनी सरकारच्या कामकाजाचा लेखाजोखा मांडत विरोधकांचा जोरदार समाचार घेतला. केंद्र आणि राज्यातील सरकार हे सामान्य जनतेच्या हितासाठी काम करणारी सरकारे आहेत. इथे घराणेशाही नाही तर कामाला न्याय मिळतो. व्यक्तीनिष्ठ पक्षाची अवस्था काँग्रेस आणि राष्ट्रवादीसारखी होते असे सांगून या निवडणुकीत त्या दोन्ही पक्षांचे नामोनिशाणही शिल्लक ठेवू नका असे आवाहन त्यांनी केले.
केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करणार आहे असे सांगून महाराष्ट्रात धुरमुक्त घर करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर गॅस कनेक्शन देण्यात आली आहेत तर बेघरांना घरे देऊन क्रांती घडवली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात पंतप्रधान ग्रामसडक योजना आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून वाड्या तांड्यावर पक्के रस्ते केले आहेत. मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. ग्रामीण भागाची आणि विकासाची गाठ महायुतीच्या सरकारने घालून दिली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने भ्रष्टाचाराशिवाय काहीच केले नाही तर महायुती सरकारच्या काळात भ्रष्टाचारमुक्त कारभार होऊन विकासाला गती मिळाली आहे. आगामी काळात विकासाची गंगा सर्वसामान्याच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले. चोहीकडे त्यांच्या सभांना जोरदार प्रतिसाद मिळत आहे. महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित राहुन पाठिंबा दर्शवित आहेत.
••••