कलम ३२४ मध्ये आरोपीला १ वर्षाची शिक्षा व ३ हजार रूपये दंड – चांदूर रेल्वे न्यायालयाचा निर्णय

47
चांदूर रेल्वे – शहजाद खान:- 
प्रेम संबंध ठेवण्याकरिता जबरदस्ती करीत लोखंडी सलाख आणून महिलेच्या डोक्यावर मारून जखमी केल्याच्या प्रकरणात आरोपीला १ वर्षाची शिक्षा व ३ हजार रूपये दंड ठोठावल्याचा निर्णय चांदूर रेल्वे येथील न्यायालयाने दिला आहे.
चांदूर रेल्वे शहरातील शिवाजीनगर मधील फिर्यादी महिलेच्या घराच्या शेजारी आरोपी नईम खान रहमान खान याचे घर आहे. नईम खान हा फिर्यादी महिलेसोबत बळजबरी बोलण्याचा प्रयत्न करून तिला त्याच्याशी प्रेम संबंध ठेवण्याकरिता जबरदस्ती करत होता. अशातच १ मे २०१८  रोजी रात्री ८ वाजताच्या दरम्यान सदर महिला तिच्या मुलांना जेवायला वाढून आईला जेवणाकरिता बोलवायला गेली असता त्यावेळी आरोपी नईम खान तिच्या अंगणात आला व काही कारण नसताना तिला शिवीगाळ करू लागला. त्यावेळी फिर्यादी महिलेने त्याला हटकले असता आरोपीने त्याच्या घरून लोखंडी सलाख आणून महिलेच्या डोक्यावर मारल्याने तिचे डोके फुटून रक्त निघाले होते तसेच त्यावेळी आरोपीने तू माझ्याशी प्रेम संबंध ठेवले नाही तर मी तुला मारून टाकीन अशी तिला धमकी देऊन तेथून निघून गेला, अशा आशयाची फिर्यादी महिलेने चांदूर रेल्वे पोलिस ठाण्यात दाखल केली होती. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलीसांनी आरोपी विरुद्ध भारतीय दंड विधान कायदा कलम ३२४, ५०४ आणि ५०६ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. सदर प्रकरणाचा निकाल चांदूर रेल्वे येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. सी. खैरनार यांनी नुकताच दिला असून यामधील आरोपी नईम खान यास भादंवि कलम ३२४ च्या अपराधा करिता एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली व आरोपीने दंडाची रक्कम भरण्यास कसूर केल्यास त्याला एका महिन्याची साध्या कैदेची शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. तसेच कलम ५०६ च्या अपराधा करिता सहा महिने सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड देण्यात आला आहे. सर्व शिक्षा एकत्रितपणे भोगावयाच्या आहे. या प्रकरणात तपास अधिकारी म्हणून महादेव पोकळे यांनी काम पाहिले तर कोर्ट पैरवी सुरेंद्र वाकोडे यांनी केली. आरोपीतर्फे अॅड. मकेश्वर यांनी तर सरकारी वकील सी. आर. डाहे हे होते. यामध्ये ठाणेदार संतोष भंडारे यांचे मार्गदर्शन लाभले.
जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।