*आठ मतदारसंघात आज मतगणना – मतमोजणी केंद्र परिसरात कलम 144 लागू*

0
771
Google search engine
Google search engine

अमरावती : जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे, बडनेरा, अमरावती, तिवसा, दर्यापूर, मेळघाट, अचलपूर व मोर्शी या आठही विधानसभा मतमदारसंघात मतमोजणी आज दि. 24 ऑक्टोबरला सकाळी 8 वाजता मतदारसंघातील नियोजित ठिकाणी आरंभ होईल. प्रत्येक मतदारसंघात चौदा टेबल याप्रमाणे एकूण 112 टेबलवर ही मतमोजणी होईल. यासाठी सुमारे पाचशे अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे.
धामणगाव विधानसभा मतदारसंघासाठी चांदूर रेल्वे ते विरुळ मार्गावरील शासकीय आयटीआय, अमरावती व बडनेरा मतदारसंघासाठी विलासनगरातील शासकीय धान्य गोदाम, तिवसा मतदारसंघासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे गोदाम, दर्यापूर मतदारसंघासाठी मुर्तीजापूर रोडवरील वैभव मंगल कार्यालय, मेळघाट मतदारसंघासाठी बुऱ्हानपूर कुसूमकोट रोडवरील बुलडाणा अर्बन बँकेचे गोदाम, अचलपूर मतदारसंघासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या लगत असलेले कल्याण मंडपम् तर मोर्शी मतदारसंघासाठी तेथील धान्यगोदामात मतमोजणी होणार आहे. मतमोजणीला संबंधित ठिकाणी सकाळी 8 वाजता सुरुवात होईल.
प्रत्येक मतदारसंघात मतमोजणीच्या निर्धारित ठिकाणी प्रत्येकी 14 टेबल राहणार आहेत. प्रत्येक टेबलवर प्रत्येकी एक पर्यवेक्षक, सहायक व मायक्रो ऑब्झर्व्हर असे तीन कर्मचारी राहणार आहे. याप्रमाणे आठही विधानसभा मतदारसंघात 112 टेबलवर मतमोजणी होणार आहे. यासाठी एकूण 336 मनुष्यबळ लागणार आहे. याव्यतिरिक्त प्रत्येकी दोनप्रमाणे 16 मायक्रो ऑब्झर्व्हर राखीव राहतील. तसेच निवडणूक निरीक्षकांचे सहायक म्हणूनदेखील दोन याप्रमाणे 16 मायक्रो ऑब्झर्व्हर राहणार आहेत. असे एकूण 256 मतमोजणी पयवेक्षक व सहायक मतगणना अधिकारी तसेच 144 सुक्ष्म निरीक्षक व इतर सहायक कर्मचारी मिळून सुमारे पाचशे कर्मचारी मतमोजणी प्रक्रिया पार पाडणार आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी जिल्ह्यातील आठ मतदारसंघात 60.57 टक्के मतदान झाले. जिल्ह्यातील एकूण 24 लाख 49 हजार 61 मतदारांपैकी 14 लाख 83 हजार 320 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 12 लाख 59 हजार 647 पुरुष मतदारांपैकी 8 लाख 4 हजार 328 मतदारांनी तर 11 लाख 89 हजार 374 महिला मतदारांपैकी 6 लाख 78 हजार 988 मतदारांनी व 40 पैकी 4 इतर मतदारांनी मतदान केले. पुरुष मतदानाची टक्केवारी 63.85 तर महिला मतदारांची टक्केवारी 57.09 आहे, तर इतर मतदारांची टक्केवारी 10 टक्के आहे.
…….

*मतमोजणी केंद्र परिसरात कलम 144 लागू*

मतमोजणीच्या दिवशी मतदान केंद्रावर मोठया प्रमाणात गर्दीचा गैरफायदा घेऊन काही दुष्ट प्रवृत्तीचे लोकांकडून मतमोजणी केंद्रावर व केंद्राच्या परिसरात गोंधळ व कायदा व सुव्यवस्थेत बाधा होईल असे कृत्य केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मतमोजणी प्रक्रिया जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश नवाल यांनी मतमोजणी केंद्राच्या परिसरात फौजदारी प्रक्रिया संहीता कलम 144  अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहे.
या आदेशानुसार मतमोजणी केंद्राच्या 100 मीटरच्या परिसरात निवडणूक आयोगाने ठरवून दिलेले उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी तसेच मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचारी  यांच्या व्यतीरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस मतमोजणी केंद्रावर प्रवेशास मनाई करण्यात आली आहे.
मतमोजणी केंद्र तसेच केंद्राच्या 100 मीटर परिसरात कुठलेही अनधिकृत संदेश प्रणाली किंवा इतर संपर्क साधने प्रशासनाच्या पूर्व परवानगीशिवाय आणण्यास किंवा बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. संपर्क साधनांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश फौजदारी प्रक्रिया संहीता कलम 144 अन्वये जारी केला असून दि. 24 ऑक्टोबरला पहाटे 5 वाजतापासून ते मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत लागू राहील. उपरोक्त आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधिताविरुध भारतीय दंड संहिता कलम 188 अंतर्गत तत्काळ कारवाई करण्यात येईल.