*‘रन फॉर युनिटी’मध्ये अमरावतीकरांचा उत्स्फूर्त सहभाग – अपर जिल्हाधिकारी संजय पवार यांनी दाखविली हिरवी झेंडी*

0
566
Google search engine
Google search engine

अमरावती- : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज, ३१ ऑक्टोबर रोजी आयोजित ‘रन फॉर युनिटी’ अर्थात राष्ट्रीय एकता दौडमध्ये अमरावतीकरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. विद्यार्थी, युवक, खेळाडू, अधिकारी, कर्मचारी, पोलीस दलातील कर्मचारी, नागरिक या एकता दौडमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी, नेहरु युवा केंद्र, शिक्षणाधिकारी कार्यालय व विविध क्रीडा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय क्रीडा संकुल येथे ‘रन फॉर युनिटी’ म्हणजेच ‘राष्ट्रीय एकता दौड’चे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यासाठी दरवर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाच्यावतीने राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात येतो, यानिमीत्य ‘रन फॉर युनिटी’चे आयोजन करण्यात आले होते.
‍शिक्षण उपसंचालक अंबादास पेंदोर, शिक्षणाधिकारी निलीमा टाके, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, क्रीडा अधिकारी वि. एस. महानकर, नेहरु युवा केंद्राच्या स्नेहल वासुतकर, धीरज जोग, अशोक महल्ले यांच्यासह स्वयंसेवी संस्था, विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.
प्रारंभी अपर जिल्हाधिकारी संजय पवार यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर अपर जिल्हाधिकारी श्री. पवार यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिनाची शपथ दिली.
अपर जिल्हाधिकारी श्री. पवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून विभागीय क्रीडा संकुल येथून दौडला सुरुवात झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे पुन्हा विभागीय क्रीडा संकुल येथे आल्यानंतर दौडचा समारोप झाला.
विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक, पोलीस व होमगार्ड कर्मचारी, पोलीस पाटील, पोलीस मित्र, अधिकारी-कर्मचारी, विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी, प्रशिक्षक, खेळाडू व नागरिक या दौडमध्ये सहभागी झाले होते.