एकोणवीस वर्षांनी पुन्हा त्याच बेंचवर….पूर्वाश्रमीचे कृषी विद्यालयात दिवाळी स्नेह मिलन

0
1041

आकोटः संतोष विणके –

एकोणवीस वर्षांपूर्वी दहावीत असताना ज्या बेंचवर बसत होते, ज्ञानार्जन करत होते, मित्रांसोबत गप्पा मारत होते… फिरुन एकदा अनुभवला तोच वर्ग… तेच शिक्षक… तेच मित्र. पुन्हा त्याच बेंचवर…
निमित्त होते वर्ष २००० च्या दहावीच्या तुकडीच्या माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याचे. भाऊसाहेब पोटे विद्यालय पूर्वाश्रमीचे कृषी विद्यालय अकोट येथील टेक्निकल तुकडीचे हे विद्यार्थी व्हाट्सप ग्रुप च्या माध्यमातून एकत्र आले. आणि दिवाळीच्या सुट्टीचे औचित्य साधून स्नेहमेळावा आयोजित केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी वर्गशिक्षक व श्री पंजाबराव गावंडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षक व निवृत्त मुख्याध्यापक भारती सर, माजी शिक्षक व विद्यमान मुख्याध्यापक प्रविण रावणकार सर, प्रवीण पोटे सर, गोपाल चव्हाण सर, के. सी. गौर सर होते. राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. सर्व शिक्षकांचा शाल, श्रीफळ, व युवाचैतन्य दिवाळी विशेषांक देऊन सत्कार करण्यात आला. माजी विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली प्रत्येकाने संघर्ष आणि यशाची कहाणी सांगीतली. या शाळेतील शिक्षक, शिक्षण, शिस्त यांच्यामुळे प्रेरणा आणि ध्येय गाठण्यासाठी नवी दृष्टी मिळाल्याचे नमूद केले. शिक्षकांना त्यांच्या सवयी, मार देण्याची पद्धत, शिकविण्याची हातोटी, जुने किस्से सांगुन प्रत्येकाने आपापल्या जागी बसून जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी शिक्षकांनी विचार व्यक्त केले.”माजी विद्यार्थ्यांनी स्वतःहून आयोजित केलेला सोहळा आणि आमचा केलेला सत्कार हा राष्ट्रपती पुरस्कार मिळण्यापेक्षा मोठा आहे. विद्यार्थ्यांचे यश आणि प्रगती बघून खूप समाधान वाटले” असे विचार श्री पंजाबराव गावंडे यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. नीलेश म्हसाये यांनी प्रास्ताविक केले, मनोज लोडम यांनी सुत्रसंचालन केले, सतिष हांडे यांनी आभार मानले. उमेश पहूरकर, सचिन हरणे, विजय साबळे, दिपक ढोले, धम्मदीप बागडे, गजानन धुळे, योगेश राठी, संजय जेस्वानी यांनी संयोजन केले.