विधान परिषद पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी जिल्ह्यातील पदवीधर मतदारांची नोंदणी वेगात करा -जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय

0
543
Google search engine
Google search engine

बीड दि.1 (जि.मा.का.) :- विधान परिषद पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी जिल्ह्यातील पदवीधर मतदारांची नोंदणी व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत.  जिल्ह्यातील पदवीधर मतदारांची नोंदणी प्रमाण वाढावे यासाठी शासकीय कार्यालयांमधील  मोठ्या संख्येने असलेल्या पदवीधर अधिकारी कर्मचारी मतदारांची नोंदणी वेगात व्हावी  शासकीय कार्यालयांच्या प्रमुखांनी त्यांच्या आस्थापनेवर असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची परिपूर्ण नोंदणी अर्ज सादर करावेत असे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिले.

          महाराष्ट्र विधान परिषद, 05 – औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ मधील मतदार नोंदणी कार्यवाहीचा आढावा जिल्हाधिकारी तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार , अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत सुकटे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण धरमकर, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, शोभा ठाकूर यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या वेळी जिल्ह्यात  71 हजार मतदार नोंदणी झाली होती .यावेळी सार्वत्रिक विधानसभा निवडणूक आणि विविध कारणांमुळे मतदार नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होण्यास सहा दिवस बाकी असताना देखील आत्तापर्यंत जिल्ह्यात 21 हजार मतदारांनी नोंदणी केली आहे. हे प्रमाण मागच्या तुलनेत कमी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पदवीधर मतदारांची नोंदणी होण्याची आवश्यकता आहे .या नोंदणीसाठी शासकीय विभागांच्या कार्यालय प्रमुखांवर जबाबदारी देण्यात येत असून त्यांच्या अधिनस्त असलेले अधिकारी-कर्मचारी तसेच शिक्षण संस्था , मंडळे, बॅका  आदींच्या मधील पदवीधर मतदारांची नोंदणी तातडीने केली जावी असे जिल्हाधिकारी श्री. पाण्डेय यांनी सांगितले.

याप्रसंगी श्री. धरमकर यांनी मतदार नोंदणी  प्रक्रिये बाबत सादरीकरण  केले. तसेच जिल्ह्यातील बीड तहसील अंतर्गत मंडळ अधिकारी श्री राख यांनी आतापर्यंत उत्कृष्ट काम करीत 7 हजार 628 पदवीधर मतदारांची अर्ज नोंदणी पूर्ण केल्याने जिल्हाधिकारी श्री पाण्डेय यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी विविध शासकीय विभागांना पदवीधर मतदार नोंदणीसाठी उद्दिष्ट निश्चित करून देण्यात आले . यामध्ये राज्य परिवहन महामंडळ ,पोलीस विभाग,  जिल्हा समाज कल्याण कार्यालय, जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षण विभाग  यासह विविध कार्यालय प्रमुखांना सूचना देण्यात आली

यावेळी मतदार नोंदणी साठी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार हे देखील सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा पदनिर्देशित अधिकारी असून त्यांनी मतदार नोंदणीचे अर्ज स्वीकारावेत तसेच मंडळ अधिकारी हे यासाठी पदनिर्देशित अधिकारी आहेत.  याच बरोबर पदवीधर मतदार नोंदणीसाठी शासकीय कार्यालयाच्या आस्थापनांवर असणाऱ्या मतदारांचे अर्ज भरून घेण्यात घेताना त्यांच्या पदवी प्रमाणपत्राची प्रत आवश्यक नसून त्यांच्या सेवापुस्तकातील पदवीच्या नोंदणी द्वारे शेडूल 3 मध्ये प्रमाणपत्र कार्यालय प्रमुख यांनी द्यावे . त्याबरोबर मतदारांनी पासपोर्ट आकाराचा फोटो, पूर्ण भरलेला अर्ज फॉर्म नमुन्यात द्यावा असे सांगण्यात आले . अधिक माहितीसाठी निवडणूक आयोगाचे मोबाईल ॲप( eci app ) चा वापर करुन व्होटर हेल्पलाईन(voter helpline) डाऊनलोड करावे असे श्री धरमकर यांनी सांगितले.

00000

वृत्त क्र. 541

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पिकविमा भरपाईसाठी शेतकऱ्यांना

दिलासा देणारा जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण आदेश

 

* 72 तासात पीक विम्याचे दावे दाखल न करू शकलेल्या शेतकऱ्यांना मिळणार यामुळे लाभ

* पिकविमाबाबत नुकसानीचे सर्वेक्षण करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती

बीड दि.1 (जि.मा.का.) :- जिल्ह्यात 19 ऑक्टोबर पासून सतत मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने  ऑक्टोबर महिन्याच्या सरासरीच्या 429 टक्के इतका  पाऊस झाला  यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत  विमा कंपनीकडून  तालुकास्तरावर नियुक्त केलेले कर्मचारी अपुरे असल्यामुळे   शेतकऱ्यांचे अर्ज  स्वीकारण्याची प्रक्रिया गाव पातळीवरील कृषी विभागाच्या यंत्रणेमार्फत    राबविण्यात येणार असल्याचे  जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी आज सांगितले .

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्री.पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी ते बोलत होते बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपजिल्हाधिकारी श्रीकांत सुकटे, प्रविण धरमकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, शोभा ठाकूर यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. पाण्डेय म्हणाले, गाव पातळीवरील पिक विमा बाबत नुकसानीचे सर्वेक्षण करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील मंडळ कृषी अधिकारी, शेतकरी प्रतिनिधी व पिकविमा कंपनीचे प्रतिनिधी यांची समिती सर्वेक्षण करून अहवाल सादर करणार असून सदर अहवालाच्या आधारे पिक विमा नुकसानीचे माहिती जिल्हा प्रशासनामार्फत विमा कंपनीस देईल, असे त्यांनी सांगीतले.

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2019 अंतर्गत आधिसूचित क्षेत्रातील पीक कापणी करून सुकवण्यासाठी पसरवून ठेवलेल्या पिकांसाठी तसेच सततच्या पावसामुळे  बाधित क्षेत्रातील अधिसूचित पिकाचे   नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी द्वारे अर्ज दाखल करण्यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे मोठी गर्दी होत आहे. विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक देखील बंद असल्याने अडचणीचे ठरत आहे यामुळे सदर आदेश देण्यात आले आहेत.

याच बरोबर राज्य शासनाकडून मिळणाऱ्या नुकसान भरपाई मदतीसाठी देखील पंचनामे करण्यात येणार असून त्याची माहिती राज्य शासनाने स्वतंत्ररित्या सादर केली जाईल यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजना आणि राज्य शासनाच्या अतिवृष्टी साठी मिळणाऱ्या नुकसान भरपाईचा  लाभ देखील मिळू शकेल यामुळे शेतकऱ्यांनी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी  करु नये व काळजी करू नये असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केले आहे.