*जिल्ह्यात कलम १४४ नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी – शांतता व सलोख्याचे प्रशासनाचे आवाहन* 

0
682
Google search engine
Google search engine

 

अमरावती: अयोध्या राम जन्मभूमी व बाबरी मस्जिद प्रकरणाबाबत निकालाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १४४ (२) नुसार अमरावती शहरासह संपूर्ण जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी शांतता व सलोखा राखण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

निकालानंतर काही उत्साही लोकांकडून गुलाल उधळणे, फटाके वाजवणे आदी प्रकार घडू शकतात. या स्थितीत इतर धर्मियांच्या भावना दुखावल्या जाऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अमरावती शहर पोलीस आयुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी प्रतिबंधात्मक आदेश पारित करण्याची विनंती जिल्हा प्रशासनाला केली. त्यानुसार जिल्हा दंडाधिकारी संजय पवार यांनी हा आदेश पारित केला आहे.

त्यानुसार *आज दि. ९ नोव्हेंबरपासून १५ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत* हे प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार आहेत.

त्यानुसार, *पाच किंवा पाचपेक्षा लोकांनी, जमावाने एकत्र जमू नये. कोणत्याही समाजाच्या भावना दुखावतील अशी प्रतिक्रिया व्हॉटस् ऍप, ट्विटर , फेसबुक किंवा कुठल्याही सोशल मीडिया किंवा होर्डिंग्ज वर प्रसारित करू नये*. तसेच मिठाई वाटप, गुलाल उधळणे,फटाके वाजवणे. मिरवणूक आदी प्रकार करू नयेत.

_कोणत्याही प्रकारचे जातीय दंगलीच्या संदर्भातील जुने व्हिडिओ, फोटो प्रसारित करू नये. भाषणबाजी, घोषणाबाजी, जल्लोष करून कोणत्याही समाजाच्या भावना दुखावण्याचा कृत्य करू नये_. कोणत्याही विशेष प्रकारे महाआरती, समूह पठण, धर्म परिषदांचे आयोजन करू नये . कोणत्याही समाजाच्या भावना दुखावतील असे पोस्टर्स, बॅनर्स लावू नये.

*मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारे धार्मिक बाबींवरून अथवा कोणत्याही कृत्याद्वारे कायदा व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होईल असे कृत्य करू नये*. _या विषयाव्यतिरिक्त इतर संदर्भात मिरवणूक काढावयाची असल्यास पोलीस आयुक्त/ अधिक्षकांची परवानगी घेणे आवश्यक आहे_. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या आदेश व सूचनांचे पालन करून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा दंडाधिकारी संजय पवार, पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर व पोलीस अधिक्षक हरी बालाजी यांनी केले आहे.