रूग्णाचे तापमान @ 102°F, अन् डॉक्टर म्हणतात आज सुटी आहे

0
892

चांदूर रेल्वे ग्रामिण रूग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षकांचा असाही बेजबाबदारपणा

चांदूर रेल्वे –
शहरातील नागरिकांना अल्पपैशात वैद्यकीय सेवा व मोफत औषधी देणे हे ग्रामिण रूग्णालयाचे आद्य कर्तव्य. मात्र, मंगळवारी शासकीय सुटीच्या दिवशी चांदूर रेल्वे रूग्णालयामधील सेवा ढेपाळल्याचे आढळून आले आहे. एका रूग्ण बालकाचे तापमान १०२ डिग्री फॅरेनहिट असतांनाही ग्रामिण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. मरसकोल्हे यांनी पेशंटला चेक न करताच आज रूग्णालयाला सुटी असल्याचे सांगितल्याचा आरोप रूग्णाच्या पालकांनी केला असुन त्यानंतर त्यांना खाजगी रूग्णालयाचा आधार घ्यावा लागला. त्यामुळे अशा बेजबाबदार व कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
चांदूर रेल्वे शहरवासीयांच्या वैद्यकीय सेवेसाठी ग्रामिण रूग्णालय असुन या ठिकाणी केवळ १० रूपयांची चिठ्ठी घेऊन उपलब्ध संपुर्ण वैद्यकीय सेवा तसेच औषधी मोफत मिळतात. यासाठी शासनाने करोडो रूपये खर्चुन अधिकारी, कर्मचारी नेमले असुन या कर्मचाऱ्यांच्या राहण्याकरीता मोठी निवासस्थाने सुध्दा बनवुन दिली आहे. शासनाकडून अधिकाऱ्यांकरिता सर्व सोई सुविधा असतांना ग्रामिण रूग्णालयातील अधिकारीवर्ग मात्र रूग्णांच्या सेवेसाठी खरे उतरतांना दिसत नाही आहे. मंगळवारी गुरूनानक जयंतीची सुटी असली तरी ग्रामिण रूग्णालयातील केवळ ओपीडी बंद असते. परंतु पेशंट सिरीयस असल्यास त्यांच्यासाठी २४ तास डॉक्टर नेमलेला असतो. अशातच मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान चांदूर रेल्वे शहरातील सामान्य नागरिक राजेश सराफी हे आपल्या १३ वर्षीय पाल्याला घेऊन ग्रामिण रूग्णालयाला गेले होते. रूग्णालयात वैद्यकिय अधिक्षक डॉ. प्रफुल्ल मरककोल्हे हे रूग्णालयाच्या गेटवरच उभे होते व ते ड्युटीवर होते. राजेश सराफी यांनी मुलाला चेकअप करण्यासाठी डॉ. मरसकोल्हे यांना म्हटले असता त्यांनी “आज सुटी आहे, आज चेक करने जमत नाही” असे बेजबाबदार उत्तर दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. साधारणत: शरीराचे तापमान ९७ ते ९९ डिग्री फॅरेनहिट असते. व १०४ च्यावर गेल्यास ते धोकादायक सुध्दा ठरू शकते. अशातच त्या बालकाचे १०२ डिग्री फॅरेनहिट एवढे भयानक तापमान असतांना ड्युटीवर हजर असलेले डॉक्टर साधा हात लावुनही चेकअप करत नसेल तर त्यांचा तेथे उपस्थितीने काय फायदा ? सर्वच कामे नर्स किंवा इतर कर्मचारी करीत असेल व सुटीच्या दिवशी डॉक्टरांनी आराम करावे का ? असे विविध प्रश्न उपस्थित होत आहे. यापुर्वीही एक्सपायरी झालेले औषधी असणे, शवविच्छेदनासाठी टाळाटाळ केल्याचे प्रकरण समोर आले असतांना आता चक्क जे कर्तव्य आहे रूग्णांची सेवा करणे, त्यालाच टाळाटाळ करत असेल तर अशा कामचुकार अधिकाऱ्यांवर वरिष्ठांकडून कारवाई करणे गरेजेचे असल्याचे मत काहींनी व्यक्त केले. यानंतर सदर पालकाने पाल्याला खासगी रूग्णालयात नेऊन औषधोपचार केल्याचे समजते.
ओपीडी असतांना रूग्णांना चेक करतात. सदर रूग्णाला मी नर्सकडे पाठविले होते. ते नर्सकडे गेले नाही व रेजीस्ट्रेशन सुध्दा केले नाही. ते आतमध्ये नर्सकडे गेले असते तर नर्सनी तापमान चेक केले असते आणि जास्त तापमान असतं तर मला फोन केला असता. तसेच मी त्यांना भरती करून द्या असंही म्हटल्याचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रफुल्ल मरसकोल्हे यांनी सांगितले. 
डॉक्टरांनी माझ्या मुलाचे सुटी असल्याचे कारण सांगुन साधं चेकअप सुध्दा केले नाही. मी पेशंट पाहु शकत नाही, तुम्ही नर्सकडून चेक करून घ्या असा सल्ला डॉ. मरसकोल्हेंनी दिला. जर डॉक्टरांचे सर्वच काम नर्स करत असेल तर मग या डॉक्टरांच रूग्णालयात काय काम आहे व पगार कशाचा घ्यायचा ?  माझ्या मुलाची तब्येत जास्त खराब असतांना मी नर्सकडून का बरं चेक करून घेणारं, माझ्या मुलाच्या जिवाचा प्रश्न असल्यामुळे मला पैसे खर्च करून खासजी रूग्णालयात जावे लागले. वरिष्ठांनी रूग्णालयातील सिसिटीव्ही तपासुन डॉ. मरसकोल्हेंवर कारवाई करावी असे रूग्णाचे पालक राजेश सराफी यांनी म्हटले आहे.
सन २०१०-११ पासुन ग्रामिण रूग्णालयाचे डॉ. महरकोल्हे हे एकाच चांदूर रेल्वे येथील ग्रामिण रूग्णालयात आहे. काही वर्षांपुर्वी त्यांना वैद्यकिय अधिक्षकाचा प्रभार मिळाला. असे असतांना ते एवढ्या वर्षापासुन एकाच रूग्णालयात असतांना त्यांच्या कार्यकाळात अनेक नवनवीन प्रकरणे समोर येत आहे. परंतु वरिष्ठ स्थानिक ग्रामिण रूग्णालयाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे अनेकांचे म्हणने आहे.