शबरीमला येथील श्री अय्यप्पा मंदिरात प्रवेश करण्यासाठी आलेल्या १० महिलांना प्रवेश नाकारला !

0
698

पांबा (केरळ) – शबरीमला येथील श्री अय्यप्पा मंदिरात १६ नोव्हेंबरला प्रवेश करण्यासाठी विजयवाडा (आंध्रप्रदेश) येथून आलेल्या १० महिलांना पोलिसांनी प्रवेश नाकारला आणि त्यांना माघारी पाठवले. विजयवाडा येथून ३० जणांचा गट दर्शनासाठी आला होता. त्यामध्ये १० ते ५० या वयोगटांतील महिलांचा समावेश होता. त्या महिला पांबा येथे आल्यानंतर पोलिसांनी त्यांची ओळखपत्रे पडताळली. त्या वेळी त्या महिला मंदिरात प्रवेशासाठी बंदी असलेल्या वयोगटातील असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांना शबरीमला येथील सध्याच्या परिस्थितीची माहिती देऊन माघारी जाण्यास सांगितले.

१. भगवान श्री अय्यप्पा यांचे मंदिर ‘मंडल-मकरविल्लक्कू’ या ४१ दिवसांच्या यात्रेसाठी १६ नोव्हेंबरला सायंकाळी खुले करण्यात आले. तत्पूर्वी पुरोहितांनी मंदिरात पाद्यपूजा केली आणि त्यानंतर ए.के. सुधीर नंबुद्री (शबरीमला) आणि एम्.एस्. प्रामेश्‍वरन नंबुद्री (मलिकापूरम्) या नव्या पुरोहितांनी सूत्रे हाती घेतली.

२. येथील शबरीमला कर्मा समितीने म्हटले आहे की, आम्ही १० ते ५० या वयोगटांतील महिलांना मंदिरात प्रवेश करू देणार नाही. त्यांचा मार्ग अडवू.

३. सर्वोच्च न्यायालयाने २८ सप्टेंबर २०१८ या दिवशी सर्व वयोगटांतील महिलांना मंदिरात प्रवेश देण्याचा निर्णय दिल्यानंतर केरळ सरकारने त्याची कार्यवाही करण्यास प्रारंभ केला; पण अय्यप्पा भक्त, विविध हिंदुत्वनिष्ठ आणि आध्यात्मिक संघटना अन् भाजप यांनी या निर्णयाच्या कार्यवाहीला तीव्र विरोध दर्शवला. न्यायालयाच्या वरील निर्णयावर पुनर्विचार याचिका प्रविष्ट करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर नुकतीच सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली; पण न्यायालयाने प्रवेश देण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली नाही. सध्या न्यायालयाने हे प्रकरण ७ न्यायाधिशांच्या खंडपिठाकडे हस्तांतर केले आहे.

 

तृप्ती देसाईंनी तीर्थक्षेत्राकडे शक्तीप्रदर्शनाची जागा म्हणून पाहू नये ! – केरळचे मंत्री के. सुरेंद्रन्

मंदिरात दर्शनासाठी येणार्‍या कुठल्याही महिलेला आम्ही संरक्षण देणार नाही आणि ज्यांना संरक्षण हवे असेल, त्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडून तसा आदेश घेऊन यावा. तृप्ती देसाईंसारख्या कार्यकर्त्यांनी तीर्थक्षेत्राकडे शक्तीप्रदर्शनाची जागा म्हणून पाहू नये.