घरकूल योजनेसाठी बिटरगावचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार

0
619
Google search engine
Google search engine

यवतमाळ- : केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व राज्य पुरस्कृत घरकूल योजनेत उत्कृष्ट काम केल्याबद्दल उमरखेड तालुक्यातील बिटरगाव (बु.) ग्रामपंचायतीचा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. गावचे सरपंच प्रकाश पेंधे व लाभार्थी रुखमाबाई दासरवाड यांच्यासह जिल्हा परिषदेच्या टिमने राज्यपालांच्या हस्ते हा गौरव स्वीकारला.
नरीमन पॉईंट मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, अपर सचिव असीम गुप्ता, ग्रामीण गृहनिर्माणच्या राज्य व्यवस्थापन कक्षाचे संचालक धनंजय माळी यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी लाभार्थी रुखमाबाई दासरवाड व सरपंच प्रकाश पेंधे यांनी उपस्थितांसमोर मनोगत मांडले. यवतमाळचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जि.प.मुख्य कार्यपालन अधिकारी जलज शर्मा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश कुलकर्णी यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानच्या जिल्हा समन्वयक अर्चना हिवराळे, प्रशांत कारमोरे यांच्या मार्गदर्शनाने व सहकार्याने घरकूल योजनेत विशेष कार्य केल्याचे नमुद केले.
यावेळी धनंजय माळी यांनी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचा विशेष उल्लेख करून सर्व टीमचे विशेष आभार मानले. एकत्रित टीम वर्कमुळे हे सहज शक्य झाले, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुलकर्णी, ग्रामीण विकास यंत्रणेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी मोरेश्वर लिखार, विस्तार अधिकारी प्रभाकर पांडे, उमरखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे, उपगटविकास अधिकारी सचिन खुडे, सहाय्यक अभियंता अनिल लाखकार, सरपंच प्रकाश पेंधे, ग्राम विकास अधिकारी प्रकाश भेंदेकर, बिटरगावच्या रुखमाबाई लक्ष्मण दासरवाड, मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक प्रल्हाद पवार आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानच्या माध्यमातून बिटरगाव (बु.) येथे घरकुलशिवाय, घरोघरी शौच्छालये, ग्रामस्थांना रोजगार, शोषखड्डे, सौभाग्य योजनेंतर्गत वीज कनेक्शन, डॉ. शामाप्रसाद मुखर्जी जनवन समिती अंतर्गत्‍ गॅस कनेक्शन, धूरमुक्त गाव, ग्रामकोष निधीतून वॉटर एटीएम, आरओ फिल्टर, शुध्द पाणीपुरवठा, मानव विकास मिशन अंतर्गत गरोदर माता, स्तनदा माता तसेच 0 ते 6 वयोगटातील मुलांची वैद्यकीय तपासणी, अंगणवाडीतील मुलांना गणवेश, डीजीटल शाळा, सोलरयुक्त शाळा, बचतगटाच्या माध्यमातून प्रशिक्षण, नोंदणीकृत कामगारांना बांधकाम साहित्य वाटप, विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत लाभार्थ्यांना स्वस्त धान्य पुरवठा, जलसंधारणाची विविध मॉडेल आदी विकासात्मक कामे करण्यात आली आहेत.