दादर नामांतरासाठी पुन्हा आंदोलन – भीम आर्मीचा इशारा <●> रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना राज्यभरातून निवेदने

0
1242

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – आंबेडकरी जनतेसाठी कळीचा मुद्दा ठरलेल्या दादर रेल्वे स्थानकाच्या नामांतराचा विषय राज्यात पुन्हा एकदा जोर धरू लागला आहे. दादर रेल्वे स्थानकाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस असे नामांतर करावे या मागणीसाठी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून निवेदने देण्यात येत असून ६ डिसेंबर पूर्वी नामांतर न झालयास आंदोलन करण्याचा ईशारा भीम आर्मीने दिला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजगृह निवासस्थान, आंबेडकर भवन तसेच चैत्यभूमी दादरमध्ये आहे ६ डिसेंबर व १४ एप्रिल रोजी राज्य तसेच देशातील लाखो जनता दादरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी येत असते त्यामुळे दादर रेल्वे स्थानकास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे अशी आग्रही मागणी देशातील आंबेडकरी अनुयायांनी केली आहे यासाठी मागील अनेक वर्षांपासून निवेदने देऊन  आंदोलने केली जात आहेत. भीम आर्मीसह विविध सामाजिक संघटनांनी या मागणीसाठी दादर नामांतराची  प्रतीकात्मक आंदोलने देखील केली आहेत. सोमवारपासून दिल्लीमध्ये केंद्र सरकारचे अधिवेशन सुरु झाले आहे. हे अधिवेशन तसेच ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनाच्या  पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा दादर नामांतराचा विषय राज्याच्या ऐरणीवर आला आहे. (कोल्हापूरचे नाव राजर्षी शाहू महाराज, व्हीकटोरीया टर्मिनसचे नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कुर्ला टर्मिनसचे नाव लोकमान्य टिळक टर्मिनस, एलफिन्स्टन रोडचे प्रभादेवी अशी नामांतर करण्यात आली आहेत तर राममंदिर नावाने स्वतंत्र रेल्वे स्थानक निर्माण केले गेले असताना अनेक वर्षांची मागणी असूनही दादर रेल्वे स्थानकाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस असे नामांतर का केले जात नाही असा सवाल भीम आर्मीने विचारला आहे.)

भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेने सोमवारपासून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार कार्यालयावर आंदोलन करून त्यांच्यामार्फत रेल्वे मंत्री पियुष गोयल याना निवेदने देण्याची मोहीम सुरु केली आहे. राज्य आणि देशातील आंबेडकरी जनतेसाठी  अस्मितेचा ठरलेल्या या विषयावर केंद्रीय अधिवेशनात निर्णय न घेतल्यास ६ डिसेबर रोजी दादरमध्ये आंबेडकरी जनतेचे मोठे आंदोलन करण्याचा ईशारा भीम आर्मीचे नेते अशोकभाऊ कांबळे आणि नेहाताई शिंदे यांनी दिला आहे.