Google search engine
Google search engine
अमरावती / चांदूर रेल्वे : (शहजाद खान) 
अमरावती शहरापासून अवघ्या १४ किलोमीटर अंतरावरील नांदगाव पेठ समोर असलेल्या सावर्डी येथे ७ डिसेंबरपासून तीन दिवसीय राज्यस्तरीय आलिमी इज्तेमाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. या धार्मिक मेळाव्यासाठी ८ लाखांहून अधिक भाविक येणार आहेत. देशाच्या विविध कान्याकोपर्‍यासह देश-विदेशातूनही मोठ्या प्रमाणात भाविक येणार आहेत. इज्तेमासाठी येणार्‍या लाखो भाविकांना मुबलक सोयी-सुविधा मिळाव्यात म्हणून राज्यभरातून आलेले हजारो मुस्लिम बांधव रात्रं-दिवस श्रमदान करीत आहेत
अमरावती शहरात ४७ वर्षांपूर्वी म्हणजेच १९६५ व १९७२ साली राज्यस्तरीय इज्तेमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर ऐतिहासिक अमरावती शहराला इज्तेमाच्या आयोजनाचा बहुमान मिळाला आहे. मागील सहा महिन्यांपासून इज्तेमाची जय्यत तयारी सुरू असून, दररोज दहा हजारांहून अधिक मुस्लिम बांधव इज्तेमास्थळी विविध कामे करीत आहेत. इज्तेमामध्ये आमिर सादसाहब यांच्यासह २० लोकांच्या विशेष उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. या इज्तेमात अल्लाहची भक्ती तसेच अल्लाहचे शेवटचे प्रेषित (दूत) मुहम्मद पै.(सल्ल) यांची शिकवण याविषयी प्रमुख उलेमा मार्गदर्शन करणार आहेत.
इज्तेमासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यांतील भाविकही उपस्थित राहतील. देश-विदेशातून मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी होणार आहेत. इज्तेमाला येणार्‍या भाविक व जमातच्या साथीदारांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सावर्डी येथे शेकडो एकर जमिनीवर काम सुरू आहे. इज्तेमा स्थळी भाविकांना नमाज अदा करण्यासाठी तसेच बसण्यासाठी सभामंडप उभारणे, हात-पाय धुण्यासाठी वजुहखाने उभारणे, भाविकांना पिण्यासाठी, आंघोळीसाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. इज्तेमाच्या परिसरात १२ छोटे-छोटे शेततळे उभारून पाण्याचा साठा करण्यात येत आहे.
इज्तेमासाठी तात्पुरत्या स्वरुपात स्वच्छतागृह उभारणे, लाईट, ध्वनियंत्रणा इत्यादी कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. संयोजकांनी प्रत्येक कामासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या मुस्लिम बांधवांवर स्वतंत्रपणे जबाबदारी सोपविली आहे. प्रत्येक जण दिलेली जबाबदारी इमाने-इतबारे पार पाडत आहे.
भरगच्च धार्मिक कार्यक्रम
या इज्तेमात ७ डिसेंबरपासुन तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. इज्तेमात मुस्लिम समुदायातील तरुण-तरुणींचे ४०० सामूहिक विवाह  ८ डिसेंबरला सायंकाळी लावण्यात येणार आहेत. ९ डिसेंबरला सकाळी प्रमुख उलेमा समाजबांधवांना मार्गदर्शन करणार असून, त्यानंतर सामूहिक दुआ होऊन या इज्तेमाची सांगता केली जाणार आहे.
२५ हजार नळ, ५ हजार स्वच्छतागृह
भाविकांना हात-पाय धुण्यासाठी जवळपास ५ हजार नळांची, तसेच ३७५० स्वच्छतागृहांची व्यवस्था केली आहे. जवळपास ५ हजार प्रसाधनगृह, २५०० गुसलखाने, जेवणासाठी ५७ दावत झोन बनविले असुन प्रतियेक झोनमध्ये ५ ते ६ हजार भाविकांची व्यवस्था केली आहे. या परिसरात विजेची व्यवस्था सुरळीत राहावी म्हणून उच्च क्षमतेचे विद्युत ट्रान्सफार्मर तसेच मोठमोठे जनरेटर बसविण्यात आले आहेत. १५० हुन अधिक जनरेटरची व्यवस्था राहणार आहे. मैदानाच्या चारही बाजूंनी अद्ययावत ध्वनियंत्रणा बसविण्यात आलेली आहे. इज्तेमात कुणी आजारी पडल्यास त्यांच्यासाठी रुग्णालय, तज्ज्ञ डॉक्टर्स, रुग्णवाहिका व औषधींची व्यवस्था आहे.
डोळ्यांचे पारणे फेरणारे सभामंडप
जवळपास १२०० हुन अधिक एकरात ४८ लाख चौरस फुटांचा भव्य सभामंडप उभारण्यात आला आहे. याशिवाय छोटे-छोटे शामियाने उभारण्यात आले आहेत. मुख्य सभामंडपात एकाच वेळी जवळपास ७ ते ८ लाख मुस्लिम बांधव बसू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
अद्वितीय अशी पार्किंग व्यवस्था
इज्तेमात येणार्‍या मुस्लिम बांधवांच्या चारचाकी व दुचाकी वाहनांसाठी चोहोबाजूंनी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. पार्किंगची व्यवस्था सांभाळण्यासाठी किमान ३ हजार स्वयंसेवक राहणार आहेत. तर पेंडॉलमध्ये २ हजार स्वयंसेवक राहणार आहे.
१५०० पोलीस कर्मचारी तैनात
या इज्तेमास्थळी सोमवारी पोलीस आयुक्त संजय बावीस्कर यांनी पाहणी केली. याठिकाणी १५०० पोलीस कर्मचारी तैनात राहणार असुन अमरावती शहरात मुख्य मार्गांवर बॅरिकेटींग केले जाणार आहे.
अतिरिक्त रेल्वे गाड्या
नांदगाव पेठ येथे मुस्लिमांच्या इज्तेमा या धार्मिक सोहळ्याचे येत्या ७ ते ९ डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता देशभरातून मुस्लिम बांधव एकवटणार आहे. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने विशेष सहा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, प्रवाशांनी गैरसोय आणि तारांबळ उडू नये, यासाठी रेल्वे स्थानकांवर नऊ
अतिरिक्त तिकीट खिडक्या उभारल्या जाणार आहेत. रेल्वे प्रशासनानेही तयारी चालविली आहे.