*मातेचे मुलीला जीवनदान – ‘सुपर स्पेशालिटी’त 10 वे किडनी प्रत्यारोपण यशस्वी*

0
1180
Google search engine
Google search engine

पुढील काळात आणखी पाच प्रत्यारोपणे

 अमरावतीचे वैद्यकक्षेत्र विस्तारतेय      

अमरावती – किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या एका 36 वर्षांच्या महिलेला तिच्या आईने किडनी देऊन जीवनदान दिले. किडनी प्रत्यारोपणाची ही प्रक्रिया विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील टीमने आज यशस्वीपणे पार पाडली. हे रूग्णालयातील 10 वे किडनी प्रत्यारोपण असून, इतरही प्रत्यारोपण प्रक्रियांसाठीही प्रयत्न होत आहेत, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी आज पत्रकारांना सांगितले.

संदर्भ सेवा रूग्णालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. अविनाश चौधरी व विशेष कार्य अधिकारी टी. बी. भिलावेकर यावेळी उपस्थित होते.

 

दारव्हा येथील अश्विनी सुनील असवार या 36 वर्षांच्या महिला रुग्ण गत सहा महिन्यापासून किडनीच्या आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्यावर नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. अविनाश चौधरी यांच्याकडे उपचार व डायलिसीस सुरु होते. त्यांना किडनी प्रत्यारोपणाची गरज लक्षात येताच अशी सुविधा अमरावतीत असल्याने समुपदेशन करण्यात आले. रुग्णाची आई वनिता दत्तात्रय कसंबे या मुलीसाठी किडनी देण्यास तयार झाल्या. त्यांच्या तपासण्या करुन राज्य प्राधिकार समितीकडे प्रत्यारोपण प्रस्ताव मान्यतेसाठी पाठविण्यात आला. समितीने तत्काळ मान्यता दिली.  त्यानुसार ही प्रक्रिया पार पाडण्यात आली, असे डॉ. निकम यांनी यावेळी सांगितले.

नागपूरचे किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. संजय कोलते, बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. निशांत बावनकुळे यांच्यासह युरो सर्जन डॉ. राहुल पोटोडे, डॉ. विक्रम देशमुख, डॉ. विशाल बाहेकर, डॉ. सुमीत अग्रवाल, डॉ. राहुल घुले, नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. अविनाश चौधरी, डॉ. निखील बडनेरकर, डॉ. सौरभ लांडे, बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. राजेश कस्तुरे, डॉ. प्रणित घोनमोडे, डॉ. पुर्णिमा वानखडे यांनी हे काम पाहिले, असे त्यांनी सांगितले.

नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. चौधरी म्हणाले की, किडनी काढणे व बसविणे या दोन प्रक्रियांसाठी साधारण 4 युरॉलॉजिस्ट स्वतंत्र टीमसह एकाचवेळेस काम करत असतात. अत्यंत मर्यादित वेळेत या प्रक्रिया पार पाडाव्या लागतात. एका व्यक्तीची किडनी काढून ती बर्फात ठेवणे, त्याला आवश्यक केमिकल लावणे व तत्काळ दुस-या रूग्णात प्रत्यारोपित करणे, यासाठी दोन पथकांचा समन्वय चांगला असणे व सजग राहणे आवश्यक असते. या कामासाठी संदर्भ सेवा रूग्णालयातील अधिकारी- कर्मचारी यांनी चांगला समन्वय ठेवला. ही शस्त्रक्रिया गुंतागुंतीची असते. मेडिको-लीगल रिस्क स्वीकारून अत्यंत आत्मविश्वासाने सजगपणे काम पार पाडावे लागते. हा स्टाफ आपल्या कामात निष्णात झाला आहे. त्यामुळे हे दहावे प्रत्यारोपण यशस्वीपणे पार पडले. यापूर्वी प्रत्यारोपण झालेल्या व्यक्ती समाधानाने जीवन जगत आहेत.

पुढील काळात आणखी पाच प्रत्यारोपणे

रुग्णालयाने पाच रुग्णांच्या प्रत्यारोपणासाठी समितीकडे परवानगी मागितली आहे. येथील आयसीयुमध्ये दोन बेड आहेत. ते लक्षात घेऊन 21 दिवसांच्या अंतराने प्रत्यारोपण पूर्ण केले जाईल. रुग्णालयात 800 ते 900 रुग्णांना मोफत डायलिसीस केले जात आहे. प्रत्यारोपण प्रक्रियेतही काही तपासण्या वगळता इतर खर्च रुग्णाला करावा लागत नाही, असेही ते म्हणाले.

अमरावतीचे वैद्यकक्षेत्र विस्तारतेय

इर्विन रुग्णालयातील सुधारणा, संदर्भ सेवा रुग्णालयातील सुविधा व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची रुग्णालये यातून अमरावती जिल्ह्यातील वैद्यक क्षेत्राचा विस्तार होत असल्याचे डॉ. चौधरी यांनी सांगितले. ते म्हणाले की, *प्रत्यारोपणासारख्या शस्त्रक्रिया अमरावतीत होत आहेत. तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत. शासकीय आरोग्य सेवेचा दर्जा उंचावल्याने एकूण वैद्यक क्षेत्रावर अनुकूल परिणाम होत आहे. पूर्वी नागपूरला जाणा-या रुग्णवाहिकांची संख्या मोठी होती. आता ती घटली आहे*.

संदर्भ सेवा रूग्णालयात आवश्यक साधनांसाठी शासनाकडे पाठपुरावा होत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

सुमारे साडेचार तास चालली प्रक्रिया

प्रक्रियेची सर्व कायदेशीर प्रक्रिया डॉ. सोनाली चौधरी व अधिक्षक सतिश वडनेरकर यांनी पार पाडली. प्रत्यारोपण प्रक्रिया सुमारे साडेचार तास चालली. अधिसेविका माला सुरपाम, माला अगमे, नीता श्रीखंडे, कविता बेराड, संगिता आष्टीकर, रितु बैस, दुर्गा घोडिले,आशा गडवार, अलका मोहोड, भारती घुशे, जमुना मावस्कर, शुभांगी टिंगणे, नम्रता दामले,डॉ. कल्पना भागवत, डॉ. मुकेश बारंगे, अशोक किणवटकर, अमोल वाडेकर, प्रफुल निमकर, कुंदन मातकर,  पंकज बेलुरकर आदींनी सहकार्य केले.

राज्य प्राधिकार समितीचे अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगिरीवार, डॉ. आर.के. राठोड, डॉ. आर.एस.फारुकी, डॉ. मनोज तगडपल्लीवार, डॉ. टी.सी.राठोड, डॉ. विकास यदशीकर, डॉ. संतोष भोसले, दिनकर पाटील आदींनी मान्यता दिली.

डॉ. मिनल चव्हाण, प्रकाश येणकर यांनी सहकार्य केले.