आदिवासी महानायक क्रांतिवीर बिरसा मुंडा यांना भारतरत्न पुरस्कार द्या – बिरसा क्रांती दलाची मागणी

0
598
चांदूर रेल्वे –
अस्मितेची ज्योत पेटवणारा पहिला आदिवासी महानायक क्रांतिवीर बिरसा मुंडा यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे अशी मागणी चांदूर रेल्वे येथील बिरसा क्रांती दलाने स्थानिक उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठवुन केली आहे.
क्रांतिवीर बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी बिहारच्या रांची जिल्ह्यात उलीहातू गावात झाला. त्यांनी हिंदू व ख्रिस्ती या दोन्ही धर्माचे शिक्षण घेतले होते. त्यांच्या २५ वर्षाच्या आयुष्यात त्यांनी आदिवासींच्या सामाजिक व आर्थिक शोषणाला आळा घालण्याची मदत केली. त्या काळातील भगतसिंग बिरसाच होते, ज्यांना इंग्रजी सत्ता सर्वात जास्त घाबरत होती. बिरसा यांनी त्यांना मिळालेल्या अतिशय अल्प आयुष्यात आदिवासींना एकत्र आणून बंडाचे सूत्र तयार केले व आवाज उठवण्याचे राजकारण शिकवले. म्हणूनच बिरसा मुंडा यांना केवळ झारखंडचेच नव्हे तर संपूर्ण समाज व देशाचे नायक म्हणून ओळखले जाते. बिरसा मुंडा यांच्या स्मृती प्रित्यर्थ झारखंड सरकारने विमानतळ, रेल्वे स्टेशन आणि विश्व विद्यालय यांना बिरसा मुंडा नाव देवून त्यांच्या कार्याचा गौरव केला. बिरसा मुंडा यांची समाधी राँचीमध्ये कोकर जवळील डिस्टिलरी पुलाजवळ आहे. त्या ठिकाणी त्यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. बिरसाच्या जन्मदिनी झारखंड राज्याची नव्याने निर्मिती झाली. हिच बिरसाच्या कार्याला सलामी होय. बिरसा यांनी आदिवासी समाजाला जागृत करून ब्रिटिश सत्ता व प्रशासकीय यंत्रणेला कडाडून विरोध करणारा सर्वात कमी वयाचा आदिवासी क्रांतिवीराचा इतिहास भविष्यात हजारो पिढ्यांना निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यामुळे अशा महान देशभक्ताला भारताचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न प्रदान करून समग्र आदिवासी समुदायाची व देशभक्त नागरिकांची मागणी मंजूर करावी अशी मागणी बिरसा क्रांती दलाचे गोकुलदास मडावी, उमेश मडावी,  राजू मडावी, प्रहारचे मयूर देशमुख, ज्ञानेश्वर सिरसाम, अनिकेत धुर्वे, संदीप उईके, किशोर सिरसाम, भीमराव मडावी, चंद्रशेखर उईके, शामराव सिरसाम आदींनी केली आहे.