साकोली-वडसा महामार्गाच्या कामाला गती द्या – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

219
जाहिरात

साकोली-वडसा महामार्गाच्या कामाला गती द्या
– विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

नागपूर, दि. 16 : साकोली ते वडसा दरम्यान होत असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम संथ गतीने सुरू आहे. साकोली ते लाखांदूर दरम्यान महामार्गाच्या कामासाठी अनेक ठिकाणी रस्ता खोदण्यात आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होवून अपघात होत आहेत. त्यामुळे या महामार्गाच्या कामाला गती देण्याच्या सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्या. या मार्गाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी रविवारी रवि भवन येथील कुटीर क्र. 17 येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते.

याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधीक्षक अभियंता एम. एम. जयस्वाल, कार्यकारी अभियंता नरेश बोरकर, भंडारा येथील उपविभागीय अभियंता संजीव जगताप यांची उपस्थिती होती.

श्री. पटोले म्हणाले, साकोली ते वडसा दरम्यान सुरू असलेल्या महामार्गाचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे, मात्र या कामाला अपेक्षित गती नाही. या कामासाठी जागोजागी करण्यात आलेल्या खोदकामामुळे वाहनधारकांना अडथळे निर्माण होत असल्याने या रस्त्यावर अपघातही वाढले आहेत. त्यामुळे या मार्गाचे काम अधिक गतीने व गुणवत्तापूर्ण होण्यासाठी या कामावर विशेष लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी इतर मार्गांच्या कामांचाही आढावा घेतला.

सहयोग नगर येथील मैदानाचा प्रश्न निकाली काढा

नागपूर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनला लिजवर देण्यात आलेले शहरातील सहयोग नगर येथील मैदान नागरिकांसाठी खुले करण्याची मागणी होत आहे. याबाबत नागपूर सुधार प्रन्यास व महानगरपालिका यांनी नियमानुसार आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापती श्रीमती शितल तेली-उगले यांची प्रमुख उपस्थिती होती.

****