मोर्शी तालुक्याला अवकाळी पावसाने व गारपिटीने झोडपले –  मोर्शी तालुक्यात संत्रासह सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान ! 

1047
जाहिरात

आमदार देवेंद्र भुयार यांनी दिले सर्वेक्षणाचे आदेश ! 

तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनी केली नुकसानग्रस्त भागांची पाहणी ! 

रुपेश वाळके विशेष प्रतिनिधी /

मोर्शी तालुक्यात चार ते पाच दिवसापासून  जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली असून मोर्शी  परिसरात जोरदार गारांचा पाऊस झाला. यात आधीच नुकसानीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिकांना  फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावल्याचे चित्र मोर्शी तालुक्यात बघायला मिळत आहे. मोर्शी तालुक्यात २ जानेवारीला सकाळी बराच वेळ गारांचा पाऊस सुरू होता. मोर्शी तालुक्यातील शेतकरी आधीच संकटात असून पुन्हा दुखावणारा अवकाळी पाऊस जोरदार वारा व गारपीट घेऊन आल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतिदायक वातावरण निर्माण झाले आहे. खरीप हंगाम अवकाळी पावसाने हिरावला. त्यात रब्बी पिकांना नुकसानकारक ठरणाऱ्या पावसाने सुरुवात केल्याने पिकांचे नुकसान होते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.

मोर्शी  तालुक्यात जोरदार पाऊस, वादळी वारा व गारपिटीचे प्रमाण जास्त आहे तालुक्यातील दापोरी , डोंगर यावली , घोडदेव , पाळा , मायवाडी , सालबर्डी , शिवारासह मोर्शी तालुक्यात पावसासह पाच मिनिटे गारपीट झाली. या परिसरात बोराच्या आकारासारखी गार शिवारातील शेतकन्यांनी पाहिली. यामुळे या शिवारातील शेतकऱ्यांचे आंबिया व मृग बहाराच्या संत्राचे व तूर , कपाशी यासह शेतीपिकांसह मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता मोर्शीचे तहसीलदार सिद्धार्थ मोरे , मंडळ अधिकारी खेरडे , कृषी सहाय्यक दिनेश चौधरी , प्रवीण सातव , बळीराजा संत्रा उत्पादक संघाचे अध्यक्ष रुपेश वाळके , समीर विघे , मनीष गुडधे , धनंजय अमदरे , संदीप काठाळे राजू रावंडे , यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी केली .

आधीच कर्जबारीपणामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांची गारपीट आणि पावसामुळे चांगलीच धांदल उडाली. आधीपासूनच अडचणींनी हैराण झालेल्या शेतकऱ्यांना यामुळे पुन्हा आर्थिक झळ सोसावी लागण्याची शक्‍यता आहे. सुलतानी संकटाने हतबल झालेला शेतकरी आता अस्मानी संकटात सापडला आहे.

अवकाळी पाऊस व गारपिटीचा सगळयात मोठा तडाखा मोर्शी तालुक्याला बसला आहे. त्यामुळे हातातील पिके मातीमोल झाली आहेत. संत्रा फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. सोबतच तूर , कापूस , गहू , व ईतर पिके जमीनदोस्त झाली आहेत.

मोर्शी वरुड तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकरी बांधवांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. गारपिटीमुळे शेतीच्या नुकसानीचे पंचनामे कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने करावेत. जिल्हा प्रशासनाने  विमा कंपन्यांची बैठक घेऊन गावनिहाय आकडेवारी त्यांना उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश आमदार देवेंद्र भुयार यांनी आज दिले. मोर्शी वरुड तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपीट झाली त्याचा आढावा आमदार देवेंद्र भुयार यांनी घेतला.

ज्या गावांमध्ये गारपीट व अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामाच्या उभ्या पिकाचे तसेच काढणी पश्चात मळणीसाठी ठेवलेल्या धान्याचे नुकसान झाले आहे त्याबाबत माहिती त्वरित विमा कंपन्यांना कळवावी. यासाठी जिल्हाधिकारी, कृषी अधिकाऱ्यांनी संबंधित विमा कंपन्यांची बैठक घ्यावी व त्यांना झालेल्या नुकसानाबाबत गावनिहाय शेतकऱ्यांची माहिती द्यावी  तसेच स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाला सादर करून मदतीबाबत प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाकडे सादर करावा, अशा सुचना आमदार देवेंद्र भुयार यांनी प्रशासनाला केल्या आहेत.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।