मोर्शी तालुक्यात  आढळल्या वाघाच्या पाऊलखुणा –  शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण !

0
2030

सदर पाऊले ही वाघाचीच असल्याचे तज्ञांचे मत .

मायवाडी येथे रेस्क्यू टीम दाखल ! 

रुपेश वाळके विशेष प्रतिनिधी /

सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या मोर्शी तालुक्यात मायवाडी परीसरात  वाघाची दहशत इतकी पसरली आहे की, अनेकांना शेतीमध्ये कामे करणे कठीण झाले आहे. दिनांक ७ जानेवारी रोजी ३ वाजताच्या सुमारास मायवाडी परिसरामध्ये आशिष गेडाम यांच्या शेतात वाघ आला असल्याचे आढळले ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले परिसरातील शेतातील सर्व शेतकरी व शेकडो शेतमजूर भीतीपोटी शेतातील सर्व कामे सोडून आपली जनावरे घेऊन जीव मुठीत घेऊन गावाच्या दिशेने पळत निघाले ,  वन विभागाच्या अधिकाऱ्यांना या प्रकाराची माहिती दिली त्यावेळी वनविभाग शोधमोहिमेवर निघाला मायवाडी शिवारात वाघाच्या पाऊलखुणा आढळून आल्याने परिसरातील शेतकरी व शेत मजुरात भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे .

मोर्शी शहरापासून अवघ्या पाच कीमी अंतरावरील मायवाडी शेतशिवारात आशिष भगवंतराव गेडाम यांच्या शेतात काही मजूर कामाला होते दुपारी चार – पाच वाजताच्या दरम्यान काम आटपून परत येतांना काही मजुरांना शेतात वाघाच्या पाऊलखुणा आढळून आल्यावर त्यांनी शेतमालक आशिष गेडाम यांना त्याविषयी माहिती दिली व त्यांनी तात्काळ वनविभागाला माहिती दिली त्यावरून दिनांक ८ जानेवारीला सकाळी वन विभागाची चमू घटनास्थळी पाहणी करण्यास गेली असता, आशिष गेडाम व त्यांचे शेजारी निलेश विघे यांच्या शेतात वाघाच्या पाऊलखुणा आढळून आल्या, त्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी निरीक्षण केले असता सदर पाऊले ही वाघाचीच असल्याचे व तो काल दुपारी तीन वाजताच्या दरम्यान सदर शेतातून गेला असल्याचे तज्ञाचे मत आहे. सदर घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभाची रेस्क्यू टीम मायवाडी येथे दाखल झाली असून मोर्शी येथील वन परिक्षेत्र अधिकारी आनंद सुरतने व रेस्क्यू टीमचे वन परिक्षेत्र अधिकारी सैय्यद कालीम व त्यांची टीम वाघाचा युद्ध पातळीवर शोध घेत आहे .


मोर्शी तालुक्यातील मायवाडी शिवारामध्ये आढळेले पगमार्क हे वाघाचेच असल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी रात्रीला एकटे शेतामध्ये जाऊ नये , परिसरातील शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी , वाघाचे लोकेशन मिळेपर्यंत परिसरातील शेतकऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन मोर्शी येथील वन परिक्षेत्र अधिकारी आनंद सुरतने यांनी केले आहे .