निलेश म्हसायेंचे प्राचिन तिर्थक्षेत्र वारीवरील पुस्तकाचे थाटात प्रकाशन

0
1047

नीलेश म्हसाये यांनी श्री क्षेत्र वारी चा इतिहास प्रकाशात आणला – उपजिल्हाधिकारी राजेश खवले

आकोटःसंतोष विणके

“आपल्या विदर्भासाठी भूषणावह असलेले पर्यटन स्थळ श्री क्षेत्र वारी हनुमान या तिर्थक्षेत्राचा प्राचीन इतिहास नीलेश म्हसाये यांनी पुस्तकरूपाने प्रकाशात आणला. यापुढे जाऊन नीलेश म्हसाये यांनी वारी महोत्सवाचे काम हाती घ्यावे त्यासाठी आपण सामुहिक प्रयत्न करु” असे प्रतिपादन तसेच पुस्तकाचे अभ्यासपूर्ण विश्लेषण उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी केले. श्रीक्षेत्र वारी हनुमान (भैरवगड)” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत श्री क्षेत्र वारी हनुमान येथे अतिशय उत्साहात संपन्न झाला.

याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उपजिल्हाधिकारी मा. संतोष खवले, कार्यक्रमांचे अध्यक्ष प. पु. कृष्णानंद भारती महाराज, प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक विजय पाटील,ज्येष्ठ साहित्यिक मा. नरेंद्र इंगळे, सौ. नयनाताई मनतकार, कॅप्टन सुनिल डोबाळे, कवी राजू चिमणकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी मा हरीप्रसाद मिश्रा, संस्थानचे अध्यक्ष मा. सुरेशराव देशमुख उपस्थित होते.
“सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी वारी हे प्रसिद्ध तिर्थक्षेत्र होते, हे लोकदैवत आहे हा इतिहास या आज लोकांपुढे आला.” असे मनोगत ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र इंगळे यांनी केले. नीलेश म्हसाये यांनी मनोगतामध्ये वारी चे ऐतिहासिक, पौराणिक आणि भौगोलिक महत्त्व विशद केले व या परिसराचा विकास व्हावा या भूमिकेतून पुस्तक लिहिल्याचे सांगितले. नयनाताई मनतकार यांनी वारी येथे विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्यास सहकार्य करण्याचे जाहीर केले.

अध्यक्षीय भाषणात प. पु. कृष्णानंद भारती महाराज यांनी “मानसिक शांती साठी भक्तीमार्ग आणि भक्तीसाठी वारी चे अनन्यसाधारण महत्त्व मांडले व या पुस्तकाने वारीची माहिती सर्वदूर जाईल असा विश्वास व्यक्त केला.” याप्रसंगी मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. विशालराजे बोरे यांनी सुत्रसंचालन केले गजाननराव म्हसाये यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिलीप म्हसाये, विशाल म्हसाये, संस्थान समिती यांनी परिश्रम घेतले.