चांदुर तालुक्यात अवैधरित्या रेती वाहतुक करणारा ट्रॅक्टर जप्त :- १ लाख ३० हजारांचा दंड

0
734

                                   चांदूर रेल्वे –

घुईखेड परिसरात रेतीची अवैध वाहतुक सुरू असल्याची बातमी काही दिवसांपुर्वी वृत्तपत्रांतुन प्रकाशीत झाली होती. यानंतर या परिसरात अवैधरित्या रेतीची वाहतुक करणारा ट्रॅक्टर जप्त करण्यात आला असुन १ लाख ३० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ही कारवाई तहसीलदार राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

अवैध रेती वाहतुकीची माहिती मिळाल्यानंतर मंडळ अधिकारी चवरे व तलाठी बोके यांच्या पथकाला धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव दशासर येथील सुभाष विष्णु कारमोरे यांच्या मालकीचा ट्रॅक्टर क्रमांक एमएच २७ एल ६३७२ अवैधरित्या १.०९ ब्रास रेती वाहतुक करतांना आढळून आला. त्यांनी हा ट्रॅक्टर जप्त करून तहसील कार्यालयात लावला. त्यानंतर सदर ट्रॅक्टर वर १ लाख ३० हजार ४०० रूपयांचा दंड ठोठावला आहे. या कारवाईमुळे रेतीमाफीयांचे धाबे दणाणले आहे.

सुभाष कारमोरे यांचा दुसराही ट्रॅक्टर जप्त

तळेगाव दशासर येथील सुभाष कारमोरे यांच्या एका ट्रॅक्टरवर १ लाख ३० हजारांचा दंड झाला असतांनाही या रेतीमाफीयाने दुसऱ्या ट्रॅक्टरने अवैध रेती वाहतुक सुरूच ठेवली. महसुल प्रशासनाने सुभाष कारमोरे यांचा दुसराही ट्रॅक्टर जप्त केला आहे. एवढी हिम्मत करणाऱ्या सदर रेती माफीयावर कुठल्या माजी लोकप्रतिनीधीचा आशिर्वाद तर नाही ना ? याबाबत अनेक उलटसुलट चर्चा ऐकावयास मिळत होती. मात्र महसुल प्रशासन रेतीमाफीयांच्या मुसक्या आवळण्यासाठी तत्पर असल्याचे दिसत आहे.

२० दिवसांत ४ लाख ३० हजारांचा दंड

तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी २० दिवसांत ४ लाख ३० हजारांचा ७९ रूपयांचा दंड रेतीमाफीयांना दिला आहे. यामध्ये पळसखेड येथील गणेश देविदास मोडक यांच्या विना नंबरच्या ट्रॅक्टरवर १ लाख ३५ हजार ८४९ रूपये, पुलगाव येथील निलेश बाबाराव सावरकर यांच्या एमएच २९ एटी ४४४६ ट्रॅक्टरवर १ लाख ६३ हजार ८३० रूपये व सुभाष कारमोरे यांच्या ट्रॅक्टरवर १ लाख ३० हजार ४०० रूपयांचा दंड आकारण्यात आला आहे.