पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हास्तरीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

0
555

अमरावती, –

राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेत पाच वर्षांपर्यंतच्या बालकांच्या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ महिला व बालकल्याण मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते आज जिल्हा रुग्णालयात झाला.

यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते कु. स्वरा अमर घटारे, तेजल कैलास मंडवे, मधुर गिरीश वाघमारे या बालकांना पोलिओ डोस पाजून मोहिमेचा शुभारंभ झाला.

मोहिमेत सुमारे
1 लाख 72 हजार 885 बालकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार आज जिल्ह्यात बुथवर लसीकरण करण्यात आले. त्यानंतर ग्रामीण भागात दि. 21 ते 23 जानेवारी व शहरी भागात पाच दिवस घरभेटी देण्यात येणार आहेत.

लोहाच्या कमतरतेमुळे अ‍ॅनिमिया उद्भवून महिलांना समस्यांना तोंड द्यावे लागते. त्याबाबत जागृती करणारे पथनाट्य यावेळी सादर करण्यात आले. या पथनाट्याची संकल्पना डॉ. श्यामसुंदर निकम यांची व लेखन पल्लवी सपकाळ यांचे होते. पालकमंत्र्यांनी सर्वांसोबत रुग्णालयाच्या पायरीवर बसून ही नाटिका पाहिली व पुष्पगुच्छ देऊन कलावंतांचे कौतुक केले.

मोहिमेत जिल्ह्यात एक हजार 959 लसीकरण केंद्रे, तसेच 229 ट्रान्झिट लसीकरण टीम, 194 मोबाईल लसीकरण टीम यासह सुमारे 4 हजार 832 मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले. मोहिमेसाठी 416 पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले. मोहिमेसाठी एस. टी. स्थानक, रेल्वे स्थानक, यात्रा, बगिचे आदी गर्दीच्या ठिकाणी बुथची व्यवस्था करण्यात आली.

जिल्हा परिषद सभापती जयंतराव देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे आदी यावेळी उपस्थित होते.