अमरावती | प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त गुरुवार, १९ फेब्रुवारी २०२६ रोजी अमरावती महानगरपालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने व मांस विक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाकडून जारी करण्यात आले आहेत.
शहरात शिवजयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन होणार असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
स्वास्थ्य विभागातील अधिकाऱ्यांना आपल्या कार्यक्षेत्रातील मांस विक्रेत्यांना पूर्वसूचना देऊन १९ फेब्रुवारी रोजी दुकाने पूर्णतः बंद राहतील याची खात्री करण्यास सांगण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
शिवजयंतीचा उत्सव शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा व्हावा, यासाठी नागरिकांनी महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महापौर श्रीचंद तेजवानी यांनी केले आहे.











