अन्न व औषध प्रशासन विभागाची विशेष मोहिम – दीड लाख रुपयांचा गुटखा जप्त

0
1324
Google search engine
Google search engine

अमरावती : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या विशेष मोहिमेत काल व आज जिल्ह्यात विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यांत सुमारे दीड लाख रूपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

राज्यात गुटखा, पान मसाला, सुगंधित सुपारी, सुगंधित तंबाखू व तत्सम पदार्थांच्या उत्पादन, साठा, वाहतूक व विक्रीवर प्रतिबंध घालण्यात आला आहे. जिल्ह्यात अवैध गुटखाविक्रीला आळा घालण्याबाबत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी नुकतेच बैठकीद्वारे निर्देश दिले होते. त्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभागाने विशेष मोहिम हाती घेतली.

मोहिमेसाठी नागपूर विभाग व अमरावती विभागातील अन्न सुरक्षा अधिका-यांचा समावेश असलेली पथके तैनात करण्यात आली. अमरावती शहरातील रेल्वे स्थानक, बसस्थानक परिसर, इर्विन चौक, सिंधी कॅम्प, बडनेरा परिसर, तसेच बडनेरा- भातकुली रस्त्यावरील पांढरी गावाचा परिसर, चांदूर रेल्वे, परतवाडा आदी 30 ठिकाणी अचानक तपासणी करण्यात आली.

मोहिमेत चार ठिकाणी प्रतिबंधित पदार्थांचा साठा आढळला.  विजय दौलतराम दुलानी (मीत नॉव्हेल्टी, बडनेरा रेल्वेस्थानक रस्ता, अमरावती) यांच्या दुकानात विमल पान मसाला, नजर गुटखा आदी 51 हजार 680 रूपये किमतीचे प्रतिबंधित पदार्थ आढळले. सच्चनंद निर्मलदास केवलानी (जयभोले पान मटेरियल, जयहिंद मार्केट, न्यू टाऊन, बडनेरा) यांच्या दुकानात नजर गुटखा, पान बहार, विमल पान मसाल आदी 22 हजार 510 रूपये किमतीचे प्रतिबंधित पदार्थ आढळले.  अब्दुल रफिक अब्दुल शफिक (चालक, गाडी क्र. एमएच 27-एक्स 8766, स्थळ- बेलोरा फाटा) यांच्याकडे 33 हजार रु. किमतीचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू- मस्तानी जर्दा, तर मोहमद हनीफ मोहमद इसाफ (चालक, गाडी क्र. एमएच04-जीसी4522, नांदगाव खंडेश्वर-चांदूर रेल्वे रोड) यांच्याकडे 38 हजार 70 रू. किमतीचा विमल पानमसाला, अन्नी गोल्ड, व्ही-1 टोबॅको व इतर प्रतिबंधित पदार्थ आढळले.

याप्रकरणी या आरोपींविरुद्ध अन्न सुरक्षा व मानक कायदा तसेच भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात येत आहे. सहआयुक्त (अन्न) सु. गं. अन्नपुरे व स. द. केदारे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई झाली. अन्न सुरक्षा अधिकारी प्रभाकर काळे, यदुराज दहातोंडे, रावसाहेब वाकडे, सीमा सूरकर, राजेश यादव, राजकुमार कोकडवार, नीलेश ताथोड, गजानन गोरे, संदीप सूर्यवंशी, गोपाल माहोरे, नितीन नवलकर यांच्यासह अनेक अधिकारी-कर्मचारी मोहिमेत सहभागी झाले. यापुढेही मोहिम अधिक धडकपणे राबविण्यात येईल, असे श्री. केदारे यांनी सांगितले.