राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्याकडून चांदूरबाजार व अचलपूर एमआयडीसी जागेची पाहणी

726
जाहिरात

राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्याकडून
चांदूरबाजार व अचलपूर एमआयडीसी जागेची पाहणी

ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी तालुक्यातील औद्योगिक विकास महामंडळाच्या जागांचा विकास होणे महत्वाचे आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध्‍ होण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेवर उद्योग उभारणीसाठी प्रयत्न करण्यात येतील, असे जलसंपदा, शालेय शिक्षण व कामगार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आज सांगितले.
चांदूर बाजार व अचलपूर तालुक्यातील एमआयडीसी जागेची पाहणी राज्यमंत्री श्री. कडू यांनी केली. त्याप्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तेजूसिंग पवार यांच्यासह भूमि अभिलेख कार्यालयाचे अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.
श्री. कडू म्हणाले की, ग्रामीण भागातील कौशल्य विकास प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थी व नागरिकांना कुशल, अकुशल कर्मचारी म्हणून रोजगार उपलब्ध व्हावा, या हेतूने तालुकास्तरावरील औद्योगिक विकास महामंडळाच्या भूखंडावर उद्योग उभारणे आवश्यक आहे. तेथील जागेवर सर्व सोयी सुविधांची उपलब्धता करुन संपूर्ण विकास करणे आवश्यक आहे. त्यामुळे उद्योजक त्याठिकाणी उद्योग, कारखाने उभारण्यासाठी पुढे येतील.
चांदूर बाजार तालुक्यातील मोर्शी- चांदुर बाजार- अचलपूर या राष्ट्रीय महामार्ग तसेच नगर परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या नागरी सुविधांची पाहणी राज्यमंत्र्यांनी दौरा प्रसंगी केली. गर्दीच्या ठिकाणी वाहतूक कोंडी होणार नाही याची खबरदारी घेऊन रस्त्यांचे काँक्रीटीकरण करावे. नागरी वस्तीतील विजेचे पोल, नाल्या व दुकाने आदी सुनियोजित ठिकाणी बसविण्यात यावे, अशा सूचना श्री. कडू यांनी दिल्या.

शिरजगाव बंड येथील उरुजे मिल्लत उर्दु हायस्कुलला भेट

शाळेच्या सर्वांगिण विकासासाठी पाच लाख रुपये निधी देणार – बच्चूभाऊ कडू

शिरजगाव बंड येथील उरुजे मिल्लत उर्दु हायस्कुलला शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आज सदिच्छा भेट दिली. तेथे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, मुला-मुलींचे भवितव्य घडविण्यासाठी शाळेचे अनन्यसाधारण महत्व आहे. शाळेत शिकल्याने मुलांमध्ये लहानपणापासून चांगले संस्कार घडतात. त्यांच्यातूनच उद्याची पिढी घडली जाते. खासगी शाळेसोबतच शासकीय शाळेचा शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे.
शिक्षकांनी मुलांना घडविण्यासाठी शिक्षणावर भर दिला पाहिजे. स्वयं अर्थ सहाय्य योजनेतून उर्दु शाळा चालविली जात आहे. ही अतिशय चांगली बाब आहे. याबद्दल शाळा व्यवस्थापन पदाधिकाऱ्यांचे कौतुक त्यांनी केले. सदर शाळेचा सर्वांगिण विकास व्हावा, शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा देण्यासाठी पाच लाख रुपयाचा निधी आमदार निधीतून देणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. शालेय विद्यार्थ्यांव्दारे बहारदार कव्वालीचे सादरीकरण करण्यात आले. शाळेच्या वतीने राज्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अलफलाह मायनोरिटी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शे. अफजल शे. मुस्तफा, सरपंच अरुणाताई मानापुरे, उपसरपंच किशोर खवले यांचेसह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

00000

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।