प्राध्यापक तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न;तरुणी गंभीर जखमी हिंगणघाट येथील धक्कादायक घटना

0
918
Google search engine
Google search engine

प्राध्यापक तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न;तरुणी गंभीर जखमी हिंगणघाट येथील धक्कादायक घटना

वर्धा, प्रतिनिधी

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे प्राध्यापक युवतीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्याची घटना आज सकाळी सव्वा सात वाजताच्या दरम्यान नंदोरी चौका समोर नंदोरी रोड वर घडली असून यात पीडित युवतीचा चेहरा व छातीचा भाग तसेच एका बाजूचां हात पूर्णपणे जळालेला आहे. आज सकाळी दरोडा या गावावरून ही युवती नंदोरी चौकात बसमधून उतरल्यानंतर नंदोरी रोडने कॉलेज कडे जात असताना मधातच हा दुर्दैवी प्रकार घडला. या घटनेतील आरोपी युवकाचे नाव हे विकी नगराळे असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.आरोपी विकी हा दारोडा येथील रहिवाशी असून त्याला सहा महिन्याची मुलगी आहे. मागील दोन तीन वर्षांपासून हा या पीडित मुलीवर एकतर्फी प्रेम करत असल्याचे देखील बोलल्या जात आहे. विकी नगराळे हा आरोपी युवक सकाळी आपल्या दुचाकीने नंदोरी रोडवर येऊन थांबलेला होता .यावेळी या क्रूर आरोपीने आपल्या दुचाकीतून बॉटलमध्ये पेट्रोल काढले तसेच कपड्याचा एक टेंभा करून तो पेटवित यातील पीडित मुलीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटविले व घटनास्थळावरून पळ काढला. मुलीला जळतांना बघताच त्या परिसरातील नागरिकांनी धाव घेतली व तिच्या अंगावर पाणी टाकून ती आग विझवली व ताबडतोब तिला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी भीमराव टेळे, हिंगणघाट पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार, व व पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले तर काही कर्मचारी आरोपी युवकाच्या शोधात निघून गेले. हिंगणघाट शहरात या घटनेची बातमी पसरताच शहरातील लोकांनी घटनास्थळी तसेच उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली मात्र उपचारा दरम्यान जखमी तरुणीची वाचा आणि डोळे यांना गंभीर इजा झाली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान आरोपी विकी याला त्वरित शिक्षा व्हावी यासाठी घटनेचा खटला हा जलदगती न्यायालयात चालविण्याचे आश्वासन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे.