पंकजाताई मुंडेंनी कधीही कोणत्याच गुन्हेगाराला पाठिशी घातले नाही – सतीश मुंडे

0
581

‘त्या’ ट्विटवरून राष्ट्रवादी काँग्रेसला झोंबल्या मिरच्या ; स्वतःची बौध्दिक दिवाळखोरी केली जाहीर

प्रतिनिधी:- दिपक गित्ते

परळी दि. ०५ – गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो, त्याला पक्ष किंवा जात नसते. पंकजाताई मुंडे यांनी कधीही कोणत्याच गुन्हेगाराला पाठिशी घातले नाही परंतु त्यांनी केलेल्या ट्विटवर प्रसिद्धी पत्रक काढून राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र स्वतःची बौध्दिक दिवाळखोरी जाहीरपणे मांडली अशा शब्दांत भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे यांनी खरमरीत टिका केली आहे.

परळीतील वाढते गुन्हेगारीचे सत्र आणि गुंडगिरी संदर्भात काही वर्तमानपत्रात बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर पंकजाताई मुंडे यांनी चिंता व्यक्त करून एक ट्विट केले. या ट्विटमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला चांगल्याच मिरच्या झोंबल्या, शहरातील वाढती गुन्हेगारी गंभीरपणे घेण्याऐवजी उलट पंकजाताई मुंडे यांनाच त्यांनी प्रसिद्धी पत्रक काढून खुलासा मागितला व स्वतःच्या अकलेचे तारे तोडले. एका ट्रक ड्रायव्हरचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केल्याची घटना शहरात नुकतीच घडली. या बातमीवर पंकजाताई मुंडे यांनी ‘अक्षम्य आहे हे !! काही राजकारणी पाठीशी घालत असतील तर पोलिसांनी कॉलर पकडून त्या गुंडाना फरफटत नेऊन अटक केली पाहिजे …बीडला सिंघम पोलीस अधिकारी पाहिजेत आणि ते आहेत हि ..त्या अधिकाऱ्यांना ओळखून यंत्रणेने त्यांना ताकद दिली पाहिजे …’ अशा प्रकारचे ट्विट केले. वास्तविक पाहता या ट्विटमध्ये त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाचा अथवा व्यक्तींचा उल्लेख केला नाही, मग यावर राष्ट्रवादी काँग्रेसला मिर्च्या झोंबण्याचे काय कारण ? पंकजाताई पालकमंत्री असतांना परळी किती शांत होती, उलट आताच असे प्रकार का घडत आहेत? याचा राष्ट्रवादीने व त्यांच्या नेत्यांनी गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे असे सतीश मुंडे म्हणाले.

राष्ट्रवादीचे यातही राजकारण

राष्ट्रवादीने त्यांच्या प्रसिद्धी पत्रकात मारहाण प्रकरणातील आरोपी भाजपचे असल्याचे म्हटले आहे, आरोपी जर आमचा असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे असं पंकजाताई म्हणाल्या असत्या का? एवढे तरी शहाणपण राष्ट्रवादीला आले पाहिजे होते. पंकजाताई मुंडे यांनी कधीही कोणत्याही गुन्हेगाराला पाठिशी घातले नाही परंतु ज्याचा या प्रकरणातही संबंध नाही अशा कार्यकर्त्यांचे बॅनर सोशल मिडियामध्ये व्हायरल करून त्याच्याशी पंकजाताई आणि भाजपचा संबंध हेतूपुरस्सर जोडणा-या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बुध्दीची कीव करावीशी वाटते असे सतीश मुंडे यांनी म्हटले आहे.