व्हॅलेंटाईन डे निमित्त मुलींना दिलेली शपथ दुर्दैवी- अदिती तटकरे >< चांदूर रेल्वेतील महिला महाविद्यालयातील प्रकार

0
1024
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे –

व्हॅलेंटाईन डे निमित्त चांदूर रेल्वे येथील महिला महाविद्यालयाच्या रा. से. यो. शिबीरात टेंभुर्णी येथे मुलींना प्रेम आणि प्रेम विवाह न करण्याची शपथ देण्यात आली होती. त्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया राज्यभरातुन येत आहेत. या प्रकरणात प्राचार्य व प्राध्यापकाने माफी मागितली तरी सदर प्रकरण थांबण्याचे नाव नाही घेत आहे. दरम्यान, “मुलींना अशी शपथ द्यायला लावणं ही दुर्दैवी बाब असल्याचं राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. अदिती तटकरे पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ येथे बोलत होत्या.

व्हॅलेंटाईन डे चे निमित्त साधून टेंभुर्णी या ठिकाणी चांदूर रेल्वेच्या महिला आणि कला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना एका प्राध्यापकाव्दारे प्रेम, प्रेम विवाह न करण्याची शपथ शुक्रवारी देण्यात आली होती. या शपथेनंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनीही मुलींनाच अशी शपथ का दिली गेली असा प्रश्न उपस्थित केला. तर आता राज्यमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, “व्हॅलेंटाईन डे निमित्त विद्यार्थिनींनी शपथ घेतली. ही दुर्दैवी बाब आहे की, त्या मुलींच्या मनात भीतीचं किंवा संशयाचे वातावरण निर्माण झालेले आहे. ते दूर करण्याची जबाबदारी शासनाची सुद्धा आहे. शिक्षकांची, आई -वडिलांची आणि समाजाची देखील ही जबाबदारी असल्याचे त्या म्हणाल्या. विद्यार्थिनींना अशाप्रकारे शपथ दिली जाणं दुर्दैवी आहे असं आदिती तटकरे म्हणाल्या. पुढं त्या म्हणाल्या की, एका बाजूला या गोष्टीचा आनंद आहे की त्या मुली म्हणतात आम्हाला अभ्यासावर लक्ष द्यायचं आहे. पण, दुसऱ्या बाजूला जी भीती त्यांच्या मनामध्ये तयार झालेली आहे. ही भीती दूर होणं गरजेचं आहे असंही तटकरे यांनी म्हटलं आहे. हे प्रकरण वाढतं असतांना महाविद्यालयातर्फे माफीनामा जाहीर करण्यात आला आहे.

माफी मागितल्याने काय होणार ?

सदर महाविद्यालयाच्या एका प्राध्यापकाकडून प्रेमविवाह न करण्याची शपथ दिल्याचा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर प्राचार्य, प्राध्यापकाकडून माफी मागण्यात आली. मोठी चुक झाल्यानंतर व वाद वाढत असतांना व महाविद्यालयाची प्रतिमा मलीन झाल्यानंतर केवळ माफी मागणे हे काही त्या शपथ घेतल्यानंतर उपाय नसुन याची चौकशी करून संबंधितांवर महाविद्यालयीन प्रशासनाकडून कारवाई होणे सुध्दा तितकेच महत्वाचे आहे, जेणेकरून पुढे असा प्रकार घडणार नाही असे मत काही शहरवासीयांनी व्यक्त केले.