सोनगाव येथील कुऱ्हाडीने मारहाण प्रकरणात एका आरोपीला ३ वर्षांचा सश्रम कारावास दोन आरोपी निर्दोष >< चांदूर रेल्वे न्यायालयाचा निर्णय

0
1109
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे –
चांदूर रेल्वे तालुक्यातील सोनगाव येथील कुऱ्हाडीने मारहाण प्रकरणात एका आरोपीला ३ वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली असुन दोन आरोपी निर्दोष सुटले आहे. हा निकाल चांदूर रेल्वे येथील दिवाणी न्यायालयाने दिला.
तक्रारदार रवी महादुरे हे सोनगाव येथील रहिवासी आहे. व जखमी फकीरचंद ठाकरे हे त्यांचे मामा आहेत. जखमी फकीरचंद ठाकरे यांच्या आईच्या जवळ आरोपींचे घर आहे. आरोपीचे जनावरे फकीरचंद यांच्या आईच्या घरासमोरील अंगणामध्ये येत असल्याने फकीरचंद यांनी त्या ठिकाणी काट्यांची कुंपन लावले होते. ६ जुलै २०१४ रोजी रात्री ११ वाजता फकिरचंद हा त्याच्या आईच्या घरी बकऱ्या बांधण्यासाठी गेला होता, तेव्हा काट्या टाकण्याच्या कारणावरून तीनही आरोपींनी मिळून संगनमताने फकीरचंद यास कुऱ्हाड व काठ्यांनी मारहाण केली. आरोपी क्रमांक १ अतुल रामदास बावणे यांनी फकीरचंद व त्याची पत्नी मनुबाई यांना कुर्‍हाडीने मारहाण केली व राहुल रामदास बावणे, रामदास उकंडराव बावणे या दोन आरोपींनी फकीरचंद यास काठ्याव्दारे मारहाण केली. यात फकीरचंद जखमी झाले होते. त्यामुळे ७ जुलै २०१४ रोजी रवी महादुरे याने चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनला आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली होती. या घटनेत प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अमीत आर. दिंडे यांनी आरोपी क्रमांक १ अतुल रामदास बावणे सोनगाव यास कलम २४८ (२) प्रमाणे भादवि कलम ३२६ नुसार शिक्षेस पात्र गुन्ह्यासाठी तीन वर्षे सश्रम कारावास व पन्नास हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. तर आरोपी क्र. २ राहुल बावणे व आरोपी क्र. ३ रामदास बावणे यांना कलम २४८ (१) प्रमाणे भादवि कलम ३२६, ५०४ नुसार शिक्षेस पात्र गुन्ह्यातून निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. ५० हजार रूपये दंडामधून ४५ हजार रुपये रक्कम ही जखमी फकीरचंद गुलाब ठाकरे यांना नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावी असा निर्णय सुध्दा न्यायालयाने दिला. या प्रकरणाचा तपास एसएसआय नामदेव राठोड व राजु उईके यांनी केला. सरकारी वकील म्हणुन डाहे तर आरोपीचे वकील म्हणुन पी. एम. कुळकर्णी यांनी काम पाहिले. यामध्ये पैरवीचे काम ठाणेदार दीपक वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली ना. पो. कॉ.  सुरेंद्र वाकोडे यांनी केले.