आकोटात शिवजयंती जलौषात साजरी

0
1196
Google search engine
Google search engine

जय भवानी…जय शिवाजीच्या गजराने शहर दुमदुमले

महिला वादकांचे ढोल पथक ठरले आकर्षण

शिवजयंतीनिमित्त
दिपोत्सव

अकोटःसंतोष विणके

स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म दिन शहरात उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला.यावेळी शिवजयंतीनिमित्त ठीकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी शिवाजी नगर येथून अश्व दिंडी पताकांसह ढोल पथकाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीचा समारोप शिवाजी महाराज पार्क येथे करण्यात आला. तत्पूर्वी सकाळी शिवाजी महाराज चौकातील अश्वारुढ पुतळ्याचे हारार्पण अभिषेक तथा पूजन करण्यात आले.

तसेच स्थानिक रेल्वे स्टेशन व बसस्थानकातील शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दरम्यान सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती अकोट च्या वतीने शिवाजीनगर मोठे बारगण येथून दुपारी तीन वाजता भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीच्या अग्रभागी शिवरायांच्या वेशभूषेतील बालक अश्वारूढ होते. तर त्यांच्यापाठोपाठ शिवरायांची मूर्ती असणारी पालखी होती.

त्यापाठोपाठ रथांवर शिवराय जिजाऊ व मावळ्यांच्या वेशभूषेतील बालके होती.मिरवणुकीत लहान मुलींनी लाठीकाठी सह विविध खेळ सादर केले. मिरवणुक मार्गावर स्वागतासाठी शहरवासीयांनी ठीकठिकाणी रांगोळ्या घातल्या होत्या,

तसेच अनेक ठिकाणी मिरवणुकीवर फुलांचा वर्षाव करण्यात येत होता. दरम्यान मिरवणुकी करिता शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष महल्ले यांच्या नेतृत्वात चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.

मिरवणूक मार्गावर यात्रा चौक, गवळीपुरा ,सोनू चौक, नरसिंग रोड येथे विविध संस्था संघटनांच्या वतीने चहापाणी फराळ थंड पेयाचे वितरण करण्यात आले. मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी व मार्गदर्शक मंडळींनी परिश्रम घेतले

महिला वादकांचे ढोल पथक ठरले आकर्षण…

शिवजयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीतील अमरावती येथील तरुण-तरुणींचे ढोल पथकाने शहरवासीयांना आकर्षित केले. ढोल पथकातील वादकांनी ढोल-ताशांच्या तालावर तरुणाईला नाचवले तर अप्रतिम वादनाचा हा कलाविष्कार बघण्यास मिरवणुक मार्गावर ठिकठिकाणी आबालवृद्धांसह महिलांनी गर्दी केली होती.

 

शिवजयंतीनिमित्त
दिपोत्सव…

शहरात शिवजयंती निमित्त नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने दिपोत्सव साजरा केला संध्याकाळी ठीक ठिकाणी दिवे लागल्याने राज्यांच्या जन्माचं स्वागत हे दीपोत्सवाने साजरे करण्यात आले दरम्यान लोकजागर संघटनेच्यावतीने दिपोत्सवासाठी सुमारे अडीच हजार दिवे वितरित करण्यात आले. मिरवणूक मार्गावर दिवे रांगोळ्या घालून पुष्पवृष्टी करत शिवाजीराजांचे जल्लोषात स्वागत करण्यात येत होते.