शेतकऱ्यांची फसवणूक आणि महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ कडेगांव तहसिल कार्यालयावर भाजपाचे धरणे आंदोलन

0
1127
Google search engine
Google search engine


महाराष्ट्रतील जनतेने नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने दिलेल्या जनादेशाचा अपमान करून सत्तेवर आलेल्या शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून आघाडी सरकारच्या बेफिकीरीमुळे राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी रोजी कडेगाव येथे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती कडेगाव तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष धनंजय देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

श्री. देशमुख म्हणाले की, भाजपाचा विश्वासघात करुन काँग्रेस–राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्ता स्थापन केलेल्या शिवसेनेने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. सरकार स्थापन करीत असतांना शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी आणि आताच्या मुख्यमंत्र्यांनी तसेच काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अवकाळीग्रस्तांना 25 हजार रुपये हेक्टरी आणि फळबागांसाठी 50 हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली होती. पण महाविकास आघाडी सरकारच्या प्रमुखांना आपल्या आश्वासनाचा विसर पडला आहे. सरसकट कर्जमाफी करू, सातबारा कोरा करू अशा घोषणा करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यापैकी एकही आश्वासन पाळलेले नाही. महाआघाडी सरकारची कर्जमाफी योजनाही शेतकऱयांची सरसकट फसवणूक करणारी आहे. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फक्त अल्प मुदतीची पीक कर्जे माफ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे बहुसंख्य शेतकऱयांना या कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही. दोन लाखांवर कर्ज असलेल्या तसेच कर्जाची नियमित परतफेड करणाऱया शेतकऱयांबाबत महाविकास आघाडीच्या कर्जमाफी योजनेत कसलाच उल्लेख नाही.

भाजपा सरकारच्या कर्जमाफीत पीक कर्ज तसेच मध्यम मुदतीचे कर्ज समाविष्ट केल्याने पॉलिहाऊस, शेडनेट, शेती उपकरणं, पशुपालन, शेळीपालन, मधमाशीपालन अशा सर्व प्रकारच्या शेतकऱयांना लाभ मिळाला होता. भाजपा सरकारच्या व्यापक कर्जमाफीमुळे 43 लाख खातेधारकांना 19 हजार कोटींचा लाभ देण्यात आला होता. तूर खरेदीचे निकष महाविकास आघाडी सरकारने बदलल्यामुळे शेतकऱ्यांकडून होणाऱ्या खरेदीचे प्रमाण खूप कमी झाले आहे. शेतकऱ्यांची घोर फसवणूक करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा भारतीय जनता पार्टी तीव्र निषेध करीत आहे, असे देशमुख म्हणाले.

त्यांनी सांगितले की, गेल्या महिन्याभरात राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. महिलांवर अत्याचार करणाऱया गुन्हेगारांना धाक बसविण्याऐवजी महाआघाडी सरकारचे मंत्री गावोगावी सत्कार घेण्यात मश्गुल आहेत. हे सरकार सत्तेवर आल्यानंतर गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही. हिंगणघाट येथील प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरुन गेला आहे. अॅसिडहल्ला, अल्पवयीन मुलींवर अत्याचार, बलात्कार, महिलांना जाळून टाकणे अशा घटना वाढू लागल्यामुळे महिला वतरुणीमुलींमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यात अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारचा भाजपा तीव्र निषेध करीत आहे.

त्यांनी सांगितले की, मंगळवारी होणाऱ्या धरणे आंदोलन भाजपा जिल्हा अध्यक्ष आमदार पृथ्वीराज देशमुख, सांगली जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संग्राम देशमुख, कडेगाव पंचायत समिती सभापती मंगल क्षीरसागर, उपसभापती आशिष घार्गे, जि. प. सदस्य अँड. शांता कनुंजे, रेश्मा साळुंखे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.