कडेगाव मध्ये नारीशाक्तीचा जागर ‘उद्योगविरा गुणगौरव पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने संपन्न

Google search engine
Google search engine

सांगली/ कडेगांव न्युज

सांगली जिल्ह्यातील कडेगांव

येथील जागृती प्रतिष्ठानने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या भव्य कार्यक्रमात उद्योगविरा गुणगौरव पुरस्कार २०२० देऊन पाच महिलांचा सत्कार करण्यात आला. कडेगाव शहराच्या इतिहासात प्रथमच आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कलाकुसर, खाद्यपदार्थ यांच्या स्पर्धांसोबतच महिला कलाकारांनी सादर केलेला आवेशपूर्ण पोवाडा आणि शिवकालीन शस्त्र कलेची प्रात्याक्षिके अशा वैविध्यपूर्ण प्रकारे आज ‘जागतिक महिला दिन’ संपन्न झाला. राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेच्या पूजनाने या कार्यक्रमाची सुरवात झाली. कार्यक्रमाचे आयोजन युवा जागृती प्रतिष्ठानने केले होते तर कार्यक्रमाची मुख्य धुरा जयंती झपाटे यांच्या खांद्यावर होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.शिला मोहिते या होत्या तर प्रमुख पाहुण्यांमध्ये चैत्राली कुंभार,भाग्यश्री गावडे,राजश्री सूर्यवंशी यांचा समावेश होता. मार्गदर्शनपर भाषण करताना प्रा. शिला मोहिते यांनी मुला-मुलींना समान पद्धतीने वागवणे आवश्यक असल्याचे सांगत स्त्रियांनी पुरुषांच्या बरोबरीने स्वतःचे आरोग्य व पोषण सांभाळले पहिजे, असे सांगितले.
कार्यामाच्या सुरवातीला कडेगावमधील निवडक यशस्वी महिला उद्योजक व व्यावसायिक यांना उद्योगविरा गुणगौरव पुरस्कार देण्यात आला. यामध्ये सुनिता कारंडे, माधवी भस्मे, रुपाली सगरे, लिना शहा, मिना भस्मे यांचा समावेश होता. अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देत अत्यंत कमी भांडवल आणि संसाधने असतानाही यशस्वी व्यवसाय व उद्योग उभा केलेल्या या महिलांचा प्रतिष्ठानच्या वतीने गुणगौरव करण्यात आला. या प्रसंगी महिलांनी तयार केलेल्या कलाकृती आणि पाककृती यांचे प्रदर्शन व स्पर्धा भरवण्यात आली होती. या निमित्ताने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये लिना शहा,भक्ती सगरे,महालक्ष्मी ग्रुप यांनी पारितोषिक मिळवले व त्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
वारंवार महिलांवरील होणाऱ्या शारीरिक हल्ल्यांचा प्रतिकार कसा करावा याचे प्रात्यक्षिक बशीर मुल्ला व इरफान मुल्ला सर यांच्या शिष्यांनी दिले. शिवकालीन युद्धकलेचे तंत्र प्रात्यक्षिक प्रेक्षकांना आश्चर्यचकीत करणारे होते. महालक्ष्मी ग्रुप या महिल्यांच्या गटाने या कार्यक्रमाची छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील पोवाडा गाऊन शोभा वाढवली. कडेगावकरांच्या वतीने स्थापत्यतज्ञ ज्ञानेश्वर शिंदे यांनी सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात सामील झालेल्या विजेत्यांना आणि निवडक सहभागींना तुळशीचे व गुलाबाचे रोप आणि ‘मी भाषण करणारच’ हे पुस्तक भेट देण्यात आले. या कार्यक्रमात कडेगाव व परिसरातील महिलांचा लक्षणीय सहभाग होता. हा कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन तरुण समाजसेविका जयंती झपाटे यांनी एकहाती केले तर यशस्वी करण्यात सागर रावळ,विक्रम शिंदे आणि नारायण कारंडे यांनी योगदान दिले. प्रशांत ओसवाल व संशोधक डॉ. गोविंद धस्के यांनी मार्गदर्शन केले.