*अनधिकृत माहिती, अफवा पसरविण्यास प्रतिबंध*

0
605

 

अमरावती-: सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 13 मार्च 2020 रोजीच्या अधिसुचनेनुसार ‘साथरोग अधिनियमा’ ची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यानुसार शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ‘महाराष्ट्र कोव्हीड     – 19 उपाययोजना नियम 2020’ हे 14 मार्च 2020 च्या अधिसुचनेनुसार प्रसिध्द केले आहे. सदर नियमावलीतील नियम 6 नुसार कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर समाजामध्ये अनधिकृत माहिती, अफवा पसरविण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या नियमाचे उल्लंघन करणा-यांविरुध्द कायदेशीर व दंडनीय कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

कोणत्याही व्यक्तिस / संस्था / संघटनांना  कोरोना विषाणू (कोव्हीड – 19) च्या पार्श्वभुमीवर कोणत्याही प्रकारच्या अफवा, अनधिकृत माहिती इलेक्ट्रॉनिक किंवा सोशल मिडीयाच्या माध्यमातून पसरविण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. याबाबत आरोग्य सेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियानचे आयुक्त, आरोग्य सेवा मुंबईचे संचालक, आरोग्य सेवा पुणेचे संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबईचे संचालक, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यामार्फत अधिकृत माहितीचे प्रसारण करण्यात येईल. याबाबतची कोणतीही अनधिकृत माहिती अथवा अफवा पसरविणा-या व्यक्ती / संस्था / संघटना या कायद्यान्वये कायदेशीर व दंडनीय कारवाईस पात्र राहतील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी आदेशित केले आहे.