४०० वर्षात गुढीपाडवा वगळता प्रथमत सावंगा विठोबा मंदिराचे दरवाजे बंद >< कोरोना व्हायरस इफेक्ट

0
1557
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे – (शहजाद खान) 
 
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्यातील अनेक महत्वाची मंदिरे बंद करण्यात येत आहे. यामध्येच आता राज्यात प्रसिध्द असलेल्या चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगा विठोबा येथील श्री कृष्णाजी अवधुत महाराजांच्या मंदिराचे सुध्दा चारही दरवाजे गावकऱ्यांच्या मागणीवरून तहसिलदार राजेंद्र इंगळे यांच्या उपस्थितीत बुधवारी बंद करण्यात आले. गुढीपाडव्याचा दिवस वगळता चारशे वर्षांच्या इतिहासात प्रथमच भाविक भक्तांच्या दर्शनासाठी मंदिर बंद करण्यात आले आहे.

४०० वर्षापूर्वी अवधुत पंथ स्थापना करणारे श्री. कृष्णाजी अवधुत महाराजांच्या पावन सावंगा विठोबा नगरीत गुढीपाडव्याच्या दिवशी लाखो भक्तांचा जनसागर लोटत असतो. देशातील लाखो भक्त कृष्णाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेवून लाखो रूपयाचा कापुर जाळून आपल्या भावना व्यक्त करतात. तसेच समतेचे प्रतिक देव व भक्तांच्या ७२ फुट उंच झेड्यांना पदस्पर्श न करता नवीन खोळ चढविण्याचा भव्य, दिव्य, चित्तथरारक धार्मिक विधी लाखो भाविक आपल्या हृदयात जपुन ठेवतात. याशिवाय वर्षभर या मंदिरात भाविक भक्तांची रेलचेल सुरूच असते. अशातच गुढीपाडव्याच्या पुर्वीच भाविक भक्तांची दर्शनासाठी गर्दी होत असतांना गावकऱ्यांनी प्रशासनाला मंदिर बंद करण्याची मागणी केली. यावरून तहसिलदार राजेंद्र इंगळे यांच्या उपस्थित तिन दरवाजे आतुन तर पुर्वेकडील दरवाजा बाहेरून बंद करण्यात आल्याची माहिती आहे. केवळ गुढीपाडव्याच्या दिवशी खोल चढवितांना मंदिरात भाविकांची जास्त गर्दी झाल्यानंतर ३ तासांकरीता मंदिराचे दरवाजे बंद होते. या व्यतिरिक्त कधीही मंदिराचे दरवाजे बंद झाले नसुन ४०० वर्षांत पहिल्यांदाच मंदिराचे प्रवेशव्दार भाविक भक्तांकरिता काही दिवसांसाठी बंद झाल्याचे जाणकार सांगतात. त्यामुळे याठिकाणी येणारे भाविक बाहेरूनच दर्शन घेत श्री. कृष्णाजी अवधुत महाराजांचा निरोप घेत आहे.

संस्थानच्या वतीने जागोजागी लावणार फ्लॅक्स

श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थांच्या वतीने गुढीपाडवा यात्रा व राम नवमी यात्रा महोत्सव तहसीलदार यांच्या आदेशान्वये कोरोणा विषाणू संसर्गामुळे रद्द करण्यात आला आहे. यात्रेत येणाऱ्या भाविकांना गर्दीमुळे संसर्ग होण्याची शक्यता असल्याने यात्रा महोत्सव स्थगित करण्यात आला असुन यात्रेच्या ठिकाणी गावात होणारे संस्थांचे सर्व महोत्सव रद्द करण्यात आले आहे व यात्रेतील गावात सर्व प्रकारचे दुकाने लावण्यात प्रतिबंधक करण्यात आला आहे. तसेच गावात येणारे सर्व मार्ग प्रतिबंधित करण्यात आले असून यात्रेतील गावात दुचाकी, तीनचाकी व चार चाकी वाहने आणण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व भाविक भक्तांनी याची दखल घेऊन शासनाला व संस्थांनला सहकार्य करावे असे आवाहन श्री विठोबा संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. या आशयाच आज जागोजागी फलक सुद्धा लावण्यात येणार आहे.