एस. टी. बसमध्ये प्रवाश्यांत अंतर ठेवण्याचे निर्देश – उभे राहून प्रवास करण्यास मनाई

0
591
Google search engine
Google search engine

 

अमरावती : कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस. टी.) गाड्यांमध्ये प्रवाश्यांमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्याबाबत निर्देश देण्यात आले असून, त्यानुसार आसनव्यवस्थाही निश्चित करून देण्यात आली आहे.

एस. टी. च्या महाव्यवस्थापकांनी याबाबतचे पत्र विभागीय नियंत्रकाना पाठविले आहे. त्यानुसार संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी निश्चित करून दिलेल्या रचनेतच प्रवाश्यांना बसवावे. विविध सामाजिक घटकांसाठी राखीव ठेवलेली आसने सद्य:स्थितीत राखीव असणार नाहीत. आगाऊ आरक्षण केलेल्या प्रवाश्यांना बसमध्ये प्राधान्याने प्रवेश देऊन अंतर राखून तयार केलेल्या आसनव्यवस्थेवर बसवावे. उर्वरित प्रवाश्यांना याच रचनेतील उर्वरित रिक्त आसने उपलब्ध करून द्यावीत. एकाही प्रवाश्याला उभे राहून प्रवास करता येणार नाही.

बसमधील आसनक्षमता पूर्ण झाल्यावरही प्रवाशी शिल्लक राहिल्यास त्यांच्यासाठी जादा फेरी सोडावी. प्रवाश्यांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. शयनयान बसमधील दोन प्रवाश्यांच्या आसनावर एकाच प्रवाश्यास प्रवास करता येईल. महाव्यवस्थापक कार्यालयाने निश्चित केलेल्या आसनव्यवस्थेतील आसनेच आरक्षणासाठी उपलब्ध असतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.