Corona virus : आयटीआयच्या तासिका निदेशकांच्या पगाराचं काय ? कामगारांचा पगार कापू नका – पंतप्रधान मोदींचं भावनिक आवाहन

0
861
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षणच्या प्रादेशिक कार्यालयाची भुमिका अस्पष्ट
अमरावती – (प्रतिनीधी)
कोरोना व्हायरसमुळे महाराष्ट्रात सर्व शाळा, महाविद्यालय, संस्थांना सुटी जाहीर करण्यात आली. यामध्ये केवळ शिक्षक वर्ग उपस्थित राहत आहे. परंतु जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील तासिका तत्वावरील निदेशकांना येण्यास  मनाई करण्यात आली असुन यांचा या सुटीच्या दिवसातील पगार सुध्दा निघण्याची शक्यता दिसत नाही. परंतु गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कामगारांचा पगार कापू नका असे व्यापारी अन् उच्च वर्गीयांना भावनिक आवाहन केले. असे असतांना मात्र शासकीय संस्थेतीलच तासिका कर्मचाऱ्यांचे पगार कपात होणार का ? हे अजुनही अमरावतीच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले नसुन कर्मचारी याबाबत अनभिज्ञ आहे.
जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरूवारी देशाला संबोधित केले. या दरम्यान देशातील उच्चवर्गीय नागरिक आणि व्यापाऱ्यांना मोदींनी आवाहन करतांना म्हटले की, नागरिक, कामगार आणि गरिब सेवाकरी व्यक्तींच्या आर्थिक हिताचाही विचार करावा. या काळात आपण सेवा खंडित केली म्हणून या कामगारांच्या पगारीत कपात करू नका, असा माझा आग्रह असल्याचे मोदींनी म्हटले. ज्याप्रमाणे तुम्हाला, मला घरं चालवायचं आहे, तसेच या सेवा देणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांनाही आपलं घर चालवायचं असतं. त्यामुळे व्यापारी, उच्च वर्गीय व्यक्ती आणि लहान-मोठ्या संस्थांनी, कंपनीत सेवा देणाऱ्यांचे वेतन न कापण्याचं आवाहन मोदींनी केलं आहे. असे आवाहन केल्यानंतर शासकीय सेवेतीलच तासिका कर्मचाऱ्यांचे पगार कसे कपात होईल ?  असा सवाल निर्माण झाला आहे. आयटीआयमधील तासिका कर्मचारी हे केवळ तासानुसारच काम करीत नसुन पुर्ण वेळ निदेशकाच्या वेळाइतके कामे करतात. याशिवाय ट्रेडचा कार्यभार हस्तांतरण सुध्दा तासिका निदेशकांकडे करावा असा आदेशही काढण्यात आला. त्यामुळे तासिक निदेशक केवळ तासांपुरते नसुन पुर्णवेळेपर्यंत प्रशिक्षण देणारे निदेशक आहे. परंतु कोरोनामुळे ३१ मार्चपर्यंत विद्यार्थ्यांना सुट्ट्या घोषीत झाल्यानंतर केवळ नियमित शिल्प निदेशक आयटीआयमध्ये उपस्थित राहत आहे. तर तासिका कर्मचाऱ्यांना आयटीआयमध्ये येऊ नये असे सांगण्यात आले. असे असले तर या दिवसांचा पगार सुध्दा मिळणार नाही अशी स्थिती आहे. मात्र पंतप्रधान मोदींनी पगार कपात न करण्याचे आवाहन केल्यानंतर आता शासकीय कार्यालयातुन या तासिका कर्मचाऱ्यांकरीता कुठले पाऊल उचलले जाणार ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ते “वर्क फ्रॉम होम” नाही का ? 
अमरावतीच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाचे प्रभारी सहसंचालक यांच्या आदेशान्वये १९ मार्चला काढलेल्या पत्रात म्हटले की, या सुट्टीच्या दिवसात प्रशिक्षणार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान होऊ नये म्हणुन सर्व निदेशकांनी डीव्हीईटी पोर्टलवर उपलब्ध ई – कंटेंट, प्रश्नसंच, गृहपाठ ईत्यादी उपलब्ध करून प्रशिक्षण देण्याच्या सुचना सर्व निदेशकांमार्फत प्रशिक्षणार्थ्यांच्या मोबाईलवर किंवा ई – मेलवर कळविण्यात यावा असे निर्देश दिले. तसेच अभ्यासक्रमाच्या संबंधित विविध वेबसाईडच्या लिंक प्रशिक्षणार्थ्यांना मोबाईलवर द्यावा जेणेकरून प्रशिक्षणार्थी वेळेचा सदुपयोग करतील व शैक्षणीक नुकसान टाळून कोरोना प्रादुर्भावास प्रतिबंध होईल असे पत्रात म्हटले आहे. त्यामुळे सदर काम संबंधित ट्रेडच्या तासिका निदेशकांना सुध्दा करावेच लागणार असुन सदर कामाला “वर्क फ्रॉम होम” म्हणता येईल. यावरून सुध्दा तासिका कर्मचाऱ्यांचा पगार निघु शकेल. परंतु अजुन याबाबत काही स्पष्ट निर्देश आलेले नाही.