कोरोना विषाणूशी मुकाबला करण्यासाठी मतदारसंघातील आरोग्य सोयी आणि सुविधेसाठी आमदार निधीतून ₹ 10 लाख देणार – आमदार विनोद निकोले

308

मुंबई / डहाणू. (विशेष प्रतिनिधी) – जागतिक कोरोना विषाणूशी मुकाबला करण्यासाठी आमदार निधीतून ₹ 10 लाख डहाणू विधानसभा मतदार संघातील आरोग्य सोयी आणि सुविधांसाठी देण्याची घोषणा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी केली असून त्याबाबत चे पत्र पालघर जिल्हाधिकारी यांना इमेल द्वारे पाठवले आहे.

यावेळी कॉ. विनोद निकोले म्हणाले की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात तसेच महाराष्ट्रात कलम 144 अन्वये संचार बंदी लागू करण्यात आली. भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) आणि इतर डाव्या पक्षांच्या पश्चिम बंगाल मधील सर्व आमदारांनी प्रत्येकी ₹ 10 लाख ही रक्कम आपल्या मतदार संघातल्या आरोग्य व्यवस्थेसाठी दिली आहे. त्याच धर्तीवर मी सुद्धा 128 डहाणू विधानसभा (अ.ज.) मतदार संघात आरोग्य सोयी आणि सुविधा सुधारण्यासाठी माझ्या आमदार निधीतून ₹ 10 लाख ही रक्कम देत आहे. जेणेकरून माझ्या मतदार संघात आरोग्य सुविधांत सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी जलद सुधारणा होऊ शकेल. भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) नेहमीच शेतकरी व कामगार वर्गासाठी काम करत आला आहे. त्याच अनुषंगाने जागतिक कोरोना विषाणूशी मुकाबला करण्यासाठी आमदार निधीतून ₹ 10 लाख मतदार संघातील आरोग्य सोयी आणि सुविधेसाठी देण्याबाबत मी आमच्या पक्षाचे केंद्रीय कमिटी सदस्य डॉ. अशोक ढवळे यांच्या सोबत चर्चा केली असता त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले. त्या नंतर लगेचच या अनुषंगाने मी पालघर जिल्हाधिकारी यांना इमेल द्वारे पत्र लिहून कळवले आहे, असे आमदार कॉम्रेड विनोद निकोले म्हणाले. कोरोना विषाणू संदर्भात आमदार निधीतून ₹ 10 लाख देणारे कॉ. विनोद निकोले हे महाराष्ट्रातील पहिले आमदार असून त्यांचे सर्व स्तरांतील नागरिक धन्यवाद व्यक्त करत आहेत.

कोरोनाशी लढण्यासाठी हा तीन आठवड्यांचा लॉकडाऊन योग्य आहे असे मत व्यक्त करतानाच, त्यामुळे जे लाखों असंघटित  कामगार, शेतमजूर व शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत आले आहेत, त्या सर्वांना ₹ 5,000 ची रक्कम आणि एक महिन्याचे मोफत धान्य सरकारने तातडीने द्यावे अशी मागणीही आमदार कॉ. विनोद निकोले यांनी केली आहे.