बेघरांसाठी निवारा- भोजनाची व्यवस्था :- 400 नागरिकांसाठी

0
857
Google search engine
Google search engine

अमरावती – : कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी प्रशासनाकडून विविध पावले उचलण्यात येत आहेत. या काळात राहण्याची व्यवस्था नसलेले, बेघर नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहता यावे, या हेतूने अमरावती शहरात सुमारे 400 नागरिकांच्या भोजन व निवासाची व्यवस्था करण्यात येत आहे. विविध सामाजिक संस्थांचे पाठबळही या उपक्रमाला मिळत आहे.
सद्य:स्थिती पाहता बेघर नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने निवारा व भोजनाची व्यवस्था होणे आवश्यक आहे. त्यामुळे तशी व्यवस्था करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले होते. तालुक्याच्या ठिकाणीही अशी व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नागरी उपजिविका अभियानात बडनेरा येथे आधार शहरी बेघर निवारा केंद्र सुरु आहे. या ठिकाणी सर्व सुविधा पुरविण्यात येतात.  कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजना व सुरक्षिततेच्या दृष्टीने घर नसलेल्या रस्त्यावर राहणा-या व्यक्तींना शोधून या केंद्रात दाखल करून घेतले जात आहे. सुमारे 70 व्यक्तींची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे,  शहरातील श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे 300 नागरिकांची सुविधा होऊ शकेल अशी व्यवस्था करण्यात येत आहे, अशी माहिती तहसीलदार संतोष काकडे यांनी दिली.
प्रत्येक नगरपरिषदेच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी अशा बेघर व्यक्ती आढळल्यास त्यांची निवास व भोजन व्यवस्था होऊ शकेल, अशी सुविधा उभारण्याचे निर्देश तालुका प्रशासन व नगरपालिका मुख्याधिका-यांना देण्यात आले आहेत. कुणीही बेघर व्यक्ती असल्यास किंवा तशी व्यक्ती कुणाच्या निदर्शनास आल्यास तालुका प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.