कोविड-१९’ साठी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा पुढाकार संस्थेकडून रु.५१लक्ष निधीचा पहिला धनादेश जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द

0
1021

अमरावती – कोविड -१९ या महामारीचे संकट संपूर्ण जगावर कोसळले आहे. भारतापुरते बोलायचे झाले तर हे संकट महाराष्ट्रात सर्वाधिक असून महाराष्ट्र सरकार त्याचा मोठ्या धैर्याने सामना करीत आहे. कोरोनासारख्या जागतिक महामारीचा सामना करताना एक नवे आर्थिक संकटही निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.या संकटांवर मात करण्यासाठी श्री शिवाजी शिक्षण संस्थेने महाराष्ट्र सरकारच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला असून याचाच एक भाग म्हणून आज रु.५१ लक्ष निधीचा पहिला धनादेश ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी – कोविड-१९’ साठी देण्यात आला.शासनाच्या वतीने अमरावतीचे निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांनी तो स्वीकारला.
शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव देशमुख यांनी आखून दिलेल्या मार्गावर चालताना श्री शिवाजी शिक्षण संस्थेने देशातील कठीण प्रसंगी नेहमीच सामाजिक जबाबदारीचे भान जपले आहे. आपले सामाजिक कर्तव्य जपताना संस्थेचे कार्यकारी परिषदेचे सर्व पदाधिकारी, आजीवन सदस्य यांच्या स्वेच्छा निर्णयानुसार आणि संस्थेचे सर्व प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांच्या एक दिवसाच्या वेतनाइतकी रक्कम स्वेच्छेने या कार्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे, असे संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी कळविले आहे.
श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने आज संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले आणि सचिव शेषराव खाडे यांनी या कार्यासाठी रु.५१ लक्ष निधीचा पहिला धनादेश ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी – कोविड-१९’ साठी निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांच्या सुपूर्द केला.