*अमरावतीत कोरोनाने एकाच निधन –  परिसर सील, निर्जंतुकीकरणाची कार्यवाही सुरु – संपर्कातील व्यक्तींची तपासणी सुरू :- जिल्हाधिकारी शैलेश नवाल*

4131

 

अमरावती: अमरावती येथील हाथीपुरा परिसरातील एका पुरुष व्यक्तीचा  2 एप्रिल रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या व्यक्तीचे थ्रोट स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सुमारे 24 नागरिकांचे थ्रोट स्वॅब घेऊन ते चाचणीसाठी नागपूर प्रयोगशाळेत पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदर नागरिकाच्या घराभोवतीच्या परिसरात तपासणी, फवारणी व इतर आवश्यक कार्यवाही होत आहे. त्यासाठी महापालिका व आरोग्य यंत्रणेची स्वतंत्र पथके कार्यरत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे दिली.

श्री. नवाल म्हणाले की,  सदर नागरिकाला सर्दी, खोकला, ताप आदी त्रास होत असल्यामुळे हा नागरिक एका खासगी रुग्णालयात दाखल होता. सदर व्यक्तीस न्यूमोनिया असल्याचे निदान खासगी डॉक्टरांनी केले होते. रुग्णाला श्वसनक्रियेत अडथळे येत असल्याचे निदर्शनास आल्यावरून खासगी डॉक्टर यांनी या व्यक्तीला जिल्हा रूग्णालयात रेफर केले होते. परंतु सदर व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, या नागरिकाचे थ्रोट स्वॅब चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल पॉजिटिव्ह आला आहे. त्यामुळे तत्काळ संपर्कातील नागरिकांचे थ्रोट स्वॅब घेणे, परिसर सील करणे, निर्जंतुकीकरण आदी प्रक्रिया सुरु करण्यात आली. गर्दी टाळण्यासाठी सदर परिसरातील दुकाने आज व रविवारी पूर्णपणे बंद असतील. सदर व्यक्तीने यापूर्वी कुठे प्रवास केला होता किंवा कसे, याचा तपास सुरू आहे. सदर व्यक्तीची तपासणी करणा-या डॉक्टरांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

ते पुढे म्हणाले की, सदर व्यक्ती ज्या रूग्णालयात दाखल होती, ते रूग्णालय सील करण्यात आले आहे. वाशिम येथे पॉझिटिव्ह आढळून आलेल्या नागरिकाने बडने-यात वास्तव्य केले होते. त्याच्या संपर्कातील 8 नागरिकांचे थ्रोट स्वॅब चाचणीसाठी पाठविण्यात आले. त्याचा अहवाल प्रलंबित आहे.

जिल्ह्यात परदेशातून, तसेच दिल्ली, नागपूर, मुंबई, पुणे व बाहेरून आलेल्या 22 हजारांहून अधिक नागरिकांची तपासणी करून त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. वैद्यकीय पथके त्यांच्या सतत संपर्कात आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनीही दक्षतेचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे. शक्यतो घराबाहेर पडू नये. ताप, खोकला आदी कुठलाही त्रास जाणवत असल्यास तत्काळ तपासणी करून घ्यावी. इतर कुणालाही असे आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे. घाबरून न जाता दक्ष राहावे. आपल्यासह इतरांचीही काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात