चांदूर रेल्वे तालुक्यात विशिष्ट समुदायाच्या भाजीविक्रेत्यांना गावकऱ्यांकडून हीन दर्जाची वागणूक

जातीय सलोखा केवळ निवडणुकी पर्यंतच मर्यादित का ?

0
2312
Google search engine
Google search engine

दिल्ली प्रकरणाच्या पार्श्वभुमीवरील प्रकार

खेड्यातील नागरिकांची अज्ञानाची प्रचिती

चांदूर रेल्वे –

भारतीय शिक्षण पाठयपुस्तकात पहिल्या पानावर असलेल्या भारत माझा देश आहे या प्रतिज्ञेचे अनुकरण प्रत्येक व्यक्तीने खऱ्या अर्थाने करावे तसेच जातीय सामाजिक सलोखा अधिक वृद्धिंगत व्हावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मत मांडतांना अनेक नेतेमंडळी दिसतात. परंतु सदर जातीय सलोखा केवळ निवडणुकी पर्यंतच मर्यादित राहतो का ? असा सवाल उपस्थित होतांना दिसत आहे. त्याचे कारण म्हणजेच, सद्याच्या दिल्लीच्या एका प्रकरणाचा चांदूर रेल्वे तालुक्याचा कुठलाही संबंध नसतांना एका विशिष्ट समुदायाच्या भाजीविक्रेत्यांना काही गावात भाजी विकायला गेले असता हीन दर्जाची वागणुक देऊन परत पाठविल्याचे धक्कादायक प्रकार घडले आहे. या प्रकारामुळे दोन समाजात व्देष पसरत असल्याचे चित्र दिसत आहे. तसेच खेड्यापाड्यातील नागरिकांनी या प्रकारामुळे आपल्या अज्ञानाची प्रचिती दिली.

अल्पसंख्यांक समुदायातील एका विशिष्ट समाजात आता मोठी जागरूकता होत आहे. राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढत आहे. त्याच वेळेला दिल्ली सारखे काही घडवले जाते आणि या सर्व प्रयत्नांवर पाणी पडते. जातीय सलोखा जोपासणे टिकवणे व वृद्धिंगत होण्यासाठी सर्वधर्मीय लोकांचा सन्मान करून त्यांना चांगली वागणुक देणे गरजेचे आहे. यानंतरच खऱ्या अर्थाने सामाजिक ऐक्य कायम राहील. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर दिल्लीत घडलेल्या प्रकरणाचा चांदूर रेल्वे तालुक्याशी कुठलाही दुरदुरचा संबंध नाही. अशातच चांदूर रेल्वे शहरातील एका विशिष्ट समुदायातील भाजीविक्रेते दररोज फ्रेश भाजीपाला घेऊन ग्राहकांची लुट न करता व्यवस्थित किंमतीमध्ये जवळच्या आसपासच्या खेड्यात जाऊन भाजीपाला विक्री करीत होते. संचारबंदी असतांना गावातील नागरिकांना शहरात न येऊ देता त्यांच्या गावापर्यंत भाजीपाला पोहचवुन आपली उपजिवीका भागवावी हाच त्या विक्रेत्यांचा उद्देश होता. परंतु चांदूर रेल्वे तालुक्यातील ५ – १० किलोमीटरच्या अंतरावरील काही गावात सदर भाजीपाला विक्रेते गेले असता ते विशिष्ट समुदायातील असल्यामुळे त्यांच्या जवळून भाजीपाला विकत न घेता त्यांना गावातुन हाकलल्याचा आरोप काही भाजीविक्रेत्यांनी केला. एका गावात तर हदच पार केली. काही महिलांनी भाजी विकत घेऊन पैसे सुध्दा दिले. आणि काही लोकांनी भाजीविक्रेत्यांना त्यांच्या समाजाविषयी विचारल्यानंतर ते विशिष्ट समुदायाचे कळल्यावर महिलांना विकत घेतलेला भाजीपाला परत देऊन पैसे परत घेतल्याचेही प्रकार घडले आहे. कधी झाले नव्हे तसे प्रकार आता होतांना दिसत आहे. संचारबंदी असतांना गावात येऊ नका असे म्हणुन जायला लावले असते तर काही वाटले नसते, मात्र धर्माची बदनामी करून आम्हाला गावाबाहेर काढणे कितपत योग्य असा सवाल त्या विक्रेत्यांनी उपस्थित केला. संकटाच्या काळात कुठे अडकल्यास मदत घेतेवेळी समाज पाहत नाही तर मग आता का ? यावरून ग्रामिण भागातील नागरिक आपल्या अज्ञानाची प्रचिती देत असल्याचे दिसते. केवळ सोशल मिडीयावरून समाजाविषयी व्देष पसरविण्याचे काम सुरू असुन फेक पोस्टचा सुध्दा ग्रामिण भागातील नागरिक भरोसा करतांना दिसत आहे. चांदूर रेल्वे तलुक्यात कुठेही कोरोनाचा रूग्ण नसुन एकाच समाजाला अशी हिन वागणुक देणे योग्य नसल्याचे मत काही शहरवासीयांनी व्यक्त केले. आता तरी या नागरिकांत बदलाव येणार का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार असुन सर्वधर्मियांना सोबत घेऊनच ही कोरोनाची लढाई पार करायची आहे.

घेतलेला भाजीपाला केला परत – विक्रेता

लॉकडाऊनच्या काळातही ताजा भाजीपाला योग्य दरात ग्रामिण भागात उपलब्ध व्हावा या हेतुने आम्ही गाडी घेऊन स्वत: आसपासच्या खेड्यापाड्यात दररोज सकाळी जात होतो. मात्र दिल्लीच्या प्रकरणाचा संबंध नसतांनाही आम्हाला राजना व सोनगाव या दोन गावातुन भाजीपाला विक्री न करता हाकलुन दिले. तर एका गावात महिलांनी विकत घेतलेला भाजीपाला परत केला. परंतु आम्ही गाववासीयांनी म्हटल्या प्रमाणे वापस आलो व आता चांदूर रेल्वे शहरातच विक्री करीत आहो. अशी आपबीती एका भाजीविक्रेत्याने सांगितली. परंतु कुठल्याही वस्तु खरेदी करतांना समाजाचा भेदभाव नसायला पाहिजे असेही त्या विक्रेत्याने म्हटले. तर टेंभुर्णी व आमला मध्ये सुध्दा असाच प्रकार घडल्याची चर्चा आहे. 

शहरातील काही भागात सुध्दा तिच स्थिती

चांदूर रेल्वे शहरातील काही सुशिक्षित भागातील नागरिक ही अशिक्षित असल्याचा भास करून देत असल्याचे चित्र आहे. काही भाजीविक्रेत्यांनी सांगितल्यानुसार, शहरातील राधा नगर, मंगलमुर्ती नगर व इतर काही परिसरात सुध्दा भाजी विक्रेत्यांसोबत काही नागरिक समाजावरून भेदभाव करीत असल्याचे सांगितले. या विशिष्ट समाजाच्या नागरिकांना तसेच परतावे लागत आहे. यावरून शहरी आणि ग्रामिण भागातील नागरिकांत फरक नसल्याचे दिसुन आले.