जिल्‍हाधिकारी, पोलीस आयुक्‍त, मनपा आयुक्‍त यांनी केली प्रतिबंधीत क्षेत्रातील वैद्यकीय सेवांची पाहणी

0
2638

अमरावती :-

जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल, पोलीस आयुक्‍त संजय बावीस्‍कर, मनपा आयुक्‍त प्रशांत रोडे यांनी प्रतिबंधीत क्षेत्रातील वैद्यकीय सेवा, मेडीकल, खाजगी रुग्‍णालय व अनुषंगिक सेवांची पाहणी केली.

अमरावती महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिका हिंदी कन्‍या माध्‍यमिक शाळा, नागपुरी गेट येथे महानगरपालिका द्वारा जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयाच्‍या चमु मार्फत कोविड-19 या रोगाचे थ्रोट स्‍वँब नमुने गोळा करण्‍यात येत असून सदर ठिकाणची पाहणी करण्‍यात आली. हाय रिस्क व लो रिस्क परिसरातील नागरिकांना सदर ठिकाणी तपासणीसाठी आणावे, असे जिल्‍हाधिका-यांनी यावेळी सांगितले. सदर ठिकाणी नागरिकांना ने आण करण्‍याच्‍या सुचना देखील त्‍यांनी यावेळी दिल्‍या. तपासणी करणा-या चमुने स्‍वतःच्‍या स्‍वास्‍थाची काळजी घ्‍यावी व सोबतच नागरिकांमध्‍ये या आजाराबाबत जनजागृती करावी असे निर्देश दिले.

यानंतर यंग मुस्लिम शहरी आरोग्‍य केंद्रास भेट देवून तेथील कामकाजाची पाहणी करण्‍यात आली व मार्गदर्शन करण्‍यात आले. दवाखान्‍यात औषधीच्‍या साठयाची पाहणी करण्‍यात आली. पथकामार्फत सर्व्‍हेक्षण कशाप्रकारे केल्‍या जात आहे याची तपासणी यावेळी त्‍यांनी केली. दवाखान्‍यामध्‍ये तसेच दवाखान्‍याच्‍या आजुबाजूचा परिसर दररोज स्‍वच्‍छ व निर्जंतुकीकरण करण्‍याच्‍या सुचना त्‍यांनी दिल्‍या. सदर केद्रांवरील उपस्थित कर्मचा-यांनी स्‍वतःचा स्‍वास्‍थाची काळजी घ्‍यावी व सदर परिसरातील नागरिकांना कोविड-19 आजाराबाबत संपुर्ण माहिती देवून त्‍यांच्‍यामध्‍ये जागृती करावी. तसेच सदर ठिकाणी साहित्‍य हवे असल्‍यास तशी मागणी केल्‍यास त्‍वरीत पुरवठा करण्‍यात येईल.

असोसिएशन उर्दु बॉईज हायस्‍कुल अँन्‍ड जुनियर कॉलेज या ठिकाणी भेट देवून सदर ठिकाणी विलगीकरण केंद्र निर्माण करण्‍याच्‍या सुचना त्‍यांनी दिल्‍या. सदर ठिकाण विलगीकरण कक्ष करण्‍यासाठी योग्‍य असून या ठिकाणी त्‍वरीत व्‍यवस्‍था करण्‍यात यावी. या शाळेत 20 खोल्‍या असून सदर परिसर निर्जंतुकीकरण करण्‍यात येईल असे मनपा आयुक्‍तांनी सांगितले.

या पाहणी दरम्‍यान त्‍यांनी औषध विक्रेते दुकानदाराशी चर्चा केली. त्‍यांना सूचना केल्‍या की, ताप, सर्दी, कोरडा खोकला, श्वसनाचा त्रास असल्‍यास, वृध्द व दिव्यांग व्यक्तींना काही त्रास असल्‍यास, कोणतेही व्यक्ती कोव्हीड- 19 च्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्‍या नागरिकांची माहिती शहरी आरोग्‍य केंद्रांवरील वैद्यकिय अधिका-यांनी द्यावी.

सक्‍करसाथ मार्गाने जात असतांना आशा वर्कर सदर परिसरात सर्व्‍हे करतांना आढळून आल्‍या. सदर आशा वर्कर कडून संपुर्ण माहिती जाणून घेतली व त्‍यांनी योग्‍य माहिती सांगितल्‍यामुळे त्‍यांच्‍या कामाचे कौतुक केले.

नागपुरीगेट, चांदणी चौक, इतवारा बाजार, नुरानी चौक, हैदरपुरा, हाथीपुरा, ताजनगर, मुज्‍जफरपुरा, लालखडी रोड, पठाण चौक, सक्‍करसाथ, अंबागेट, सातखिराडी, गांधी चौक या परिसराची पाहणी केली.

वैद्यकीय पथके नागरिकांच्‍या सतत संपर्कात आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनीही दक्षतेचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे. शक्यतो घराबाहेर पडू नये. ताप, खोकला, श्‍वसनाचे विकार आदी कुठलाही त्रास जाणवत असल्यास तत्काळ तपासणी करून घ्यावी. इतर कुणालाही असे आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे. घाबरून न जाता दक्ष राहावे. आपल्यासह इतरांचीही काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.