कोटा येथे अडकलेले अमरावतीचे 72 विद्यार्थी लवकरच परतणार स्वगृही

0
1041

पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या प्रयत्नांना यश

 

अमरावती:-   राजस्थानातील कोटा येथे अडकलेल्या अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांना सुखरूप परत आणण्यासाठी पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व प्रशासनाने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. पालकमंत्री व प्रशासनाच्या पाठपुराव्याने परिवहन विभागाकडून एसटी वाहनांची व्यवस्था करण्यात येत असून, जिल्ह्यातील एकूण 72 विद्यार्थी लवकरच कोटा येथून स्वगृही परतणार आहेत.

 

आय.आय.टी. व मेडिकलच्या प्रवेश परीक्षेची तयारी करण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थी राजस्थानमधील कोटा येथे गेले होते. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशात सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे ते विद्यार्थी त्या ठिकाणीच अडकले होते. त्यांना परत गावाकडे आणण्याच्या पालकांच्या मागणीनुसार राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे विनंती केली, त्याचप्रमाणे, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याही ही बाब निदर्शनास आणून विद्यार्थ्यांना परत येण्यासाठी परवानगी देण्याची विनंती केली. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनीही या बाबीचा कोटा प्रशासनाशी संपर्क ठेवून सातत्याने पाठपुरावा केला.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी पत्राद्वारे, तसेच दूरध्वनीद्वारे राजस्थान शासन-प्रशासनाशी संपर्क साधला होता. त्यानुसार राजस्थान सरकारने अमरावती जिल्ह्यातील या विद्यार्थ्यांना आपल्या मूळ गावी जाण्यासाठी परवानगी दिली. दरम्यान, अमरावतीप्रमाणेच इतरही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी धुळे येथून 70 बसेस रवाना करण्याचा निर्णय परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी घेतला आहे. त्यानुसार हे विद्यार्थी लवकरच परतणार आहेत.

 

पालकमंत्र्यांच्या निर्देशानंतर जिल्हाधिकाऱ्यांनीही वेळोवेळी दूरध्वनीवरून संपर्क साधून या विद्यार्थ्यांना कोटा येथून अमरावतीला आणण्याच्या नियोजनाबाबत चर्चा केली होती. त्यासाठी स्वतंत्र वाहने पाठविण्याची तयारीही करण्यात आली होती. ही बाब पालकमंत्र्यांनी वेळोवेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे व उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार आता एस. टी. महामंडळाच्या बस पाठविण्याचा निर्णय शासनाने घेतला.

लॉकडाऊन कालावधी सुरू असून खबरदारी म्हणून या सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल. या सर्वांना खबरदारी म्हणून 14  दिवसांपर्यंत होम क्वॉरंटाईन करण्यात येईल. विद्यार्थी व पालकांकडून या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त होत असून, त्यांनी महाराष्ट्र शासन, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री श्रीमती ठाकूर, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, जिल्हाधिकारी शैलेश नवाल व इतर अधिकारी व मान्यवरांचे आभार मानले आहेत. परराज्यातून आम्ही आमच्या घरी सुखरुप येण्याची परवानगी मिळाल्याबद्दल आमचा आनंद व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडत आहेत, अशा शब्दात विद्यार्थ्यांनी दूरध्वनीवरून भावना व्यक्त केल्या आहेत.