अमरावती विद्यापीठातील कोरोना चाचणी लॅब सुरू :-  दररोज शंभर नमुने तपासले जाणार 

0
2103

पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचा पाठपुरावा

 

अमरावती:- कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी उपाययोजनाना गती मिळावी म्हणून अमरावती येथे लॅब सुरू करण्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. संत गाडगेबाबा अमरावती  विद्यापीठातील केंद्रीय उपकरणीकरण कक्ष येथे कोरोना चाचणी लॅब  कार्यान्वित करण्यात आली असून आज 24 संशयितांचे अहवाल चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

कोरोना  संसर्ग प्रतिबंधासाठी संशयितांचे अहवाल तात्काळ मिळण्यास फार मोठी सोय अमरावतीकर नागरिकांसाठी विद्यापीठाच्या माध्यमातून झाली आहे. अहवाल तात्काळ मिळणार असल्यामुळे उपचार जलदगतीने करणे आता शक्य होणार आहे. अमरावती जिल्ह्यातून कोरोना हद्दपार करण्याच्या प्रयत्नांना यामुळे बळ मिळणार असून, उपायांना गती येईल व अमरावतीकरांना दिलासा मिळणार आहे.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी लॅब सुरू होण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर प्रयत्न केले. ही लॅब कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठात स्थापित झाली होती. आवश्यक तपासण्याकरिता मशीन सुद्धा प्राप्त झाल्या होत्या. त्यासाठी मान्यता आयुर्विज्ञान संस्थानतर्फे प्राप्त झाली. त्याच दिवशी पालकमंत्र्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे पाठपुरावा करून लॉगिन आयडी सुद्धा मिळवून दिला. बायोसेफ्टी गाईडलाईन्स व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ covid-19 करिता असलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार लॅबला मान्यता प्रदान झाली आहे.

विद्यापीठातील या प्रयोगशाळेत एका दिवसाला सुमारे शंभर नमुने तपासले जाणार असून त्याचा अहवाल त्याच दिवशी मिळणार आहे. या  लॅबमध्ये  चार खोल्या सलग टेस्टिंगकरिता असून सुरक्षिततेचे सर्व उपाय योजण्यात आले आहेत. विद्यापीठातील बायोटेक्नॉलॉजी विभागातील प्रोफेसर डॉ. प्रशांत ठाकरे हे या लॅबचे नोडल अधिकारी असून सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील प्रा.डॉ. नीरज घनवटे व  वनस्पतीशास्त्र विभागातील प्रा. डॉ. प्रशांत  गावंडे हे अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय डॉ. मुकेश बुरंगे, एमडी,  पॅथॉलॉजी व डॉ.उज्वला  कवाने,  एमडी,  मायक्रोबायोलॉजी स्पेशालिटी हॉस्पिटल, अमरावती हे वैद्यकीय अधिकारी तपासणी अहवाल सादर करणार आहेत. याशिवाय  टेस्टिंग करिता संशोधक विद्यार्थी कु. निलू सोनी,  कु. प्रज्ञा पिंपळकर,  कु. पुजा मालवीय,  श्री योगेश बेले यांची मदत लॅब मध्ये होणार आहे.

कोरोना संसर्गाचा प्रतिबंध करण्यासाठी शहरात प्रथमत: लॅब  सुरू झाल्याबद्दल व त्यासाठी प्रस्ताव,  प्रशिक्षण,  स्थापना आदी बाबींसाठी विद्यापीठातील प्राध्यापक व  अधिकारी यांनी  प्रयत्न केल्याबद्दल पालकमंत्री श्रीमती ठाकूर, कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू डॉ. राजेश जयपुरकर,  कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.याशिवाय सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, शासकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांच्या प्रयत्नाबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले आहेत.

डॉ. पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्येही लॅब सुरु होण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत आहेत. तिथे  यंत्रणाही लवकरात लवकर कार्यान्वित करून घ्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. फॉरेन्सिक लॅबलाही अशी सूचना करण्यात आली आहे.  अशा प्रकारे 2-3 लॅब अमरावतीत झाल्या तर संपूर्ण विभागाला त्याचा फायदा होईल. जेवढे जास्त स्वॅब तपासता येतील, तेवढी तपासणीची प्रक्रियाही जलद व व्यापक होते. लॅबसाठी पीपीई कीटस् व इतर ज्या ज्या गोष्टी लागतील, त्या जिल्हा नियोजन निधीतून देण्यात येतील. या कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री ॲड. ठाकूर यांनी दिली.

लॅब सुरू होण्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न व सहभाग राहिला आहे. सगळ्यांच्या प्रयत्न, सहकार्य व एकजूटीतूनच आपण कोरोनाच्या महासंकटावर मात करू शकू, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.

अमरावती जिल्ह्यात संशयितांचे घेतलेले थ्रोट स्वॅब नागपूर, वर्धा व अकोला येथील प्रयोगशाळांत तपासणीसाठी पाठविण्यात येत होते. आता अमरावतीतच लॅब सुरू झाल्याने चाचणी अहवाल लवकर प्राप्त होऊन उपचार, इतरांची तपासणी व इतर उपाययोजना आदी प्रक्रियेला गती मिळेल व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्याचा लाभ होईल.