थेट बांधावर बियाणे, खत पुरवठा करण्याच्या मोहिमेत शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे: ना. विजय वडेट्टीवार

0
531
Google search engine
Google search engine

बियाणे खते व किटकनाशके पुरवठा मोहीमेस सुरूवात

चंद्रपूर- दि.6 मे : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर या कालावधीत शेतकऱ्यांची कृषि सेवा केंद्रावर गर्दी होऊ नये तसेच शेतकऱ्यांना एकत्रितरीत्या खरीप हंगामासाठी लागणारी बियाणे खते यांचा त्यांचे बांधावर पुरवठा करण्याचे उद्देशाने निविष्ठा पुरवठा करणाऱ्या वाहनास राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे हिरवी झेंडी दाखवून बियाणे खते व किटकनाशके पुरवठा मोहीमेस प्रारंभ केला.

थेट बांधावर बियाणे, खत पुरवठा करण्याच्या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केले.

या अंतर्गत चंद्रपूर तालुक्यातील चोरगाव येथील महात्मा फुले शेतकरी बचत गटातील 35 शेतकऱ्यांनी एकत्र येवून गटप्रमुख तथा शेतकरी मित्र पांडूरंगजी कोकोडे यांनी 280 किलो बियाणे आणि रासायनिक खताच्या 308 पिशव्या खरेदी करिता लागणारी रक्कम 2 लाख 31 हजार गटातील सर्व शेतकऱ्यांकडून गोळा करून व्यंकटेश कृषि सेवा केंद्रातून एकत्रित खरेदी केली.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. उदय पाटील, कृषि उपसंचालक तथा उप विभागीय कृषि अधिकारी रविंद्र मनोहरे, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी शंकर किरवे, तालुका कृषि अधिकारी प्रदीप वाहणे, मंडळ कृषि अधिकारी शभाष्कर गायकवाड, कृषि पर्यवेक्षक बुग्गेवार, कृषि सहायक दुमाने, दोनोडे, वाळके, उपस्थित होते.

चंद्रपूर जिल्ह्यातील आत्मा नोंदणीकृत 3 हजार 200 गटांनी आपल्या गटातील तसेच इच्छुक असलेल्या गटाबाहेरील शेतकऱ्यांनी एकत्रितरीत्या बियाणे आणि खते यासाठी लागणारी रक्कम त्यांचे गटाचे गट प्रमुखाकडे गोळा करून त्यांचे मार्फत कृषि सेवा केंद्र किवा थेट कंपनी यांचेकडून खरेदी करण्याची कार्यवाही करावी.जेणेकरून कृषि सेवा केंद्रावर गर्दी होणार नाही. याकरिता गटाची बियाणे आणि खते खरेदीची एकत्रित मागणी तालुका कृषि अधिकारी यांचे मार्फत संबधित कृषि सेवा केंद्र किंवा थेट कंपनीकडे नोंदविण्याची कार्यवाही करावी.असे आवाहन कृषी विभागाअंतर्गत करण्यात येत आहे.